
फलटण : जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. तेथील पिकाचे सततच्या पावसाने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, इत्यादी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी ‘पंतप्रधान फसल बीमा योजना’ पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली. याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांसाठी ही योजना लागून असून शेतकऱ्यांनी ३१ जुलै अखेर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तीकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील योजनेत सहभागी योजण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे. त्या बँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सर्वाजनिक सुविधा केंद्र व विमा कपंनीच्या संकेतस्थळाद्वारे ३१ जुलै २०२५ पूर्वी हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी गावपातळीवरील सहाय्यक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
