
फलटण : जिरायती अथवा बागायती शेतीमध्ये पिक उत्पादन वाढीसाठी ‘रुंद सरी वरंबा’ हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून हे तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी जरूर अवलंब करावा असे आवाहन पिराचीवाडी, ता.फलटण गावचे सरपंच दिपक सावंत यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी सतीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत पिराचीवाडी, ता.फलटण येथील शेतकरी अवीराज शिंदे यांच्या शेतात ‘रुंद सरी वरंबा’ (बी.बी.एफ) पेरणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी सावंत बोलत होते.
शेतकऱ्यांनी जर ‘रुंद सरी वरंबा’ (बी.बी.एफ) या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने पावसाळ्यात पाणी साचत नाही, पाण्याचा योग्य निचरा झाल्याने पिकांची मुळे कुजण्याचा धोका कमी होतो. बुरशीजन्य रोग कमी होतात. मूलस्थानी जलसंधारण झाल्याने पडलेल्या पावसाच्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो. सरीवर पेरणी झाल्याने मुळे हवेशीर राहतात. तणांचा प्रादुर्भाव कमी आणि तण काढणे सोपे होते व मातीची धुपही कमी होते. पिकांना खते मुळाजवळ देता येतात. सरीतुन पाणी दिल्याने ते थेट मुळापर्यंत पोहोचते. उत्पादनात वाढ होते. यांत्रीकीकरणाद्वारे आंतरमशागतीसाठी जागा उपलब्ध होते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठीही हे तंत्रज्ञान वरदान ठरते अशी माहिती यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे यांनी दिली.
यानंतर बीबीएफ तंत्राने पेरणी केलेल्या वरुण घेवडा पिकाच्या क्षेत्राची पहाणी शेतकऱ्यांनी केली.
बीबीएफ हि एक कार्यक्षम शाश्वत शेती पद्धत असून या तंत्रज्ञानामुळे पिक व उत्पादन वाढ चांगल्या प्रकारे होईल अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
