
फलटण : हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात दि हॉकी सातारा संघटनेच्या निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे, वेदिक वाघमोडे यांची निवड झाली आहे. यापैकी निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे यांची सलग तिसऱ्या वर्षी राज्याच्या संघात निवड झाली आहे तर वेदिका वाघमोडे हि राज्याच्या संघात स्थान मिळविणारी सर्वात लहान खेळाडू ठरली आहे.
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने रांची येथे दि. ७ ते१५ जुलै या कालावधीमध्ये हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी हॉकी महाराष्ट्राच्या वतीने स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेपूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी दि हॉकी सातारा संघटनेच्या पाच महिला खेळाडू कु. निकिता वेताळ, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का केंजळे, कु. तेजस्विनी कर्वे व कु. वेदिका वाघमोडे यांची निवड झाली होती.
सराव शिबिराच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या महिला संघाची अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये दी हॉकी सातारच्या चार खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत आपले स्थान मिळवले. यामधील निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे यांनी सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळवत सातारा जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील बहुमान उंचाविला आहे. महाराष्ट्राच्या १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये सलग दोन वर्ष कर्णधार पद भूषवणारी वेदिका वाघमोडे हिने प्रथमच संघटनेच्या सब ज्युनिअर महिला हॉकी संघामध्ये आपले स्थान कायम केले. महाराष्ट्राच्या संघातील वयाने सर्वात लहान खेळाडूचा मान तिने मिळवला आहे. या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेला आहे.
या खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे व सचिन धुमाळ हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणामध्ये त्यांना बीबी खुरंगे हे सहाय्यक म्हणून सहाय्य करीत आहेत.
सदर निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश (आयपीएस), वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, उपाध्यक्ष ओलंपियन धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, पंकज पवार , प्रवीण गाडे, विजय मोहिते, महेंद्र जाधव, सचिन लाळगे, माजी राष्ट्रीय खेळाडू सुजीत निंबाळकर आदींनी अभिनंदन केले.
