
फलटण : घरेलू कामगारांचे जे प्रश्न, समस्या व मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या अखत्यारीत ज्या ज्या समस्या, मागण्या व प्रश्न येतात त्याबाबत आपण निश्चितपणे केंद्र स्तरावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलू व त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करु, वेळप्रसंगी सदर प्रश्न संसदेतही मांडू असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
समता घरेलू कामगार संघटना, फलटण यांच्यावतीने कोळकी ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे ‘आपला खासदार प्रतिबद्ध खासदार अभियान’ व घरेलू काम करणाऱ्या महिलांना ‘भांडी वाटप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मासूम संस्था, पुणे च्या संयोजक जया नलगे, युवा संस्था मुंबई चे कार्यक्रम समन्वयक विजय खरात, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, समता घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये जेवढ्या घरेलू कामगार महिला आहेत, त्यांच्यासाठी जे काही योगदान देता येईल त्यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देत खासदार मोहिते पाटील म्हणाले, घरेलू कामगार संघटनेच्या सर्व सदस्यांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देणे त्याचबरोबर त्यांच्या मागण्या, प्रश्न समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण घरेलू कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. फलटण येथील समता घरेलू कामगार संघटना खऱ्या अर्थाने गरजू लोकांसाठी काम करीत आहे आणि त्यांना आमचे सदैव पाठबळ राहणार आहे.

घरेलू कामगारांचे प्रश्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील मार्गी लावतील : संजीवराजे
घरकाम करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या व्यतिरिक्त अन्य ज्या योजना आहेत त्यांची माहिती आणि त्याही योजनांचा लाभ त्यांना कसा घेता येईल या दृष्टिकोनातून समता घरेलू कामगार संघटनेने आयोजित केलेला हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. कामा-कामांमध्ये भेदभाव न मानता प्रत्येकाच्या कामाला सन्मान मिळायला हवा, त्याचबरोबर आर्थिक सुरक्षाही मिळायला हवी त्यामुळे केवळ फलटण तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील व देशातील घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चितपणे लक्ष घालतील व ते मार्गी लावतील असा विश्वास यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

तर त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल : मा. आ. दीपक चव्हाण
घरेलू कामगारांचा आर्थिक स्तर नेहमीच बिकट राहिला आहे. उदरनिर्वाह व प्रपंच करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे घरेलू कामगार महिलांना जर शासनाचे संरक्षण व पाठिंबा मिळाला तर खऱ्या अर्थाने त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी केले.
घरेलू कामगारांच्या विविध मागण्या आहेत त्यांचे प्रश्न तीव्र आहेत आपण विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना घरेलू कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, शासकीय मदती व्यतिरिक्त घरेलू कामगारांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आम्ही यापूर्वी वह्या, पुस्तके, दप्तरे अशा प्रकारे शालेय साहित्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आगामी काळात शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला कसा मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरेलू कामगार महिलांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत गोष्टी त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही निश्चितपणे कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी दीपक चव्हाण यांनी दिली.

कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महिलांना भांडी वाटप करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कल्पना मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आभार किरण कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास घरेलू काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

