
फलटण : गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात अनेक स्थित्यंतरे झाली. अपवाद वगळता राज्यात सर्वच पक्षांची सत्ता आली आणि गेली. मात्र फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजकारण आणि राजकारण करीत आहे. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. त्या मुळे भविष्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी केले.
फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने फलटण शहरात सभासद नोंदणी शुभारंभ, पक्ष प्रवेश आणि पक्ष कार्यकारिणी निवड कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते. या वेळी आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेचे नेते शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, महानंदाचे माजी उपाध्यक्ष डी.के.पवार, महाराष्ट्र प्रदेश युवकचे उपाध्यक्ष मनोज देशमुख, युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिभा शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहूल निंबाळकर, अशोकशेठ सस्ते आदींची उपस्थिती होती.
सचिन पाटील हे अजित पवार यांच्या विचारांचे आमदार असल्याने अजित पवार यांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये विविध विकास कामे होतील याबाबत फलटणकरांनी निश्चिंत राहावे असा विश्वास देऊन खासदार पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या कामाचा आवाका व निर्णय क्षमता जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला परिचित आहे. शिर्डीच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सभासद नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम फलटण येथे पार पडत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील यात शंका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरून जे आदेश येतील, त्या प्रमाणे आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात किंबहुना प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ती आपण सर्वजण मिळून पार पाडू असा विश्वास व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आता कामाला लागावे. तुमच्या आणि लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या यांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही खासदार नितीन पाटील यांनी यावेळी दिली.
‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार : आ. पाटील
माझा पक्ष प्रवेश झाल्यापासून आपण राष्ट्रवादीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. पक्ष वाढवण्यासाठी फलटण तालुक्यात ‘गाव तेथे शाखा’ हे अभियान आम्ही राबविणार आहोत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेचे दहा हजार सभासद पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही स्वीकारले आहे, ते एका महिन्यात पूर्ण करू असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
शिवरूपराजेंची आ. रामराजे यांना कोपरखळी !
आमदार सचिन पाटील, तालुका कार्यकारिणी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दहा हजार पक्ष सभासद नोंदणी करून फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्याबरोबरच तालुक्यातील काही लोक आपल्या पक्षात फक्त टेक्निकली आहेत अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता मारली.
निवड झालेले नूतन पदाधिकारी
फलटण तालुका कार्यकारिणी :
सतीश शिंदे (उपाध्यक्ष), नंदकुमार नाळे (उपाध्यक्ष), निवृत्ती खताळ (उपाध्यक्ष), अजित भोसले (सरचिटणीस),
विराज सोनवलकर (सरचिटणीस), अजिंक्य ढेकळे (युवक तालुकाध्यक्ष), अमित सोनवलकर (युवक उप तालुकाअध्यक्ष पूर्ण विभाग), संदीप काशिद (आयटी सेल तालुकाध्यक्ष), रणजीत भुजबळ (ओबीसी सेल तालुकाध्यक्ष),
फलटण शहर कार्यकारिणी :
राहुल निंबाळकर (शहराध्यक्ष), गौरव नष्टे (युवक उपाध्यक्ष), बाबा भोई (ओबीसी सेल शहराध्यक्ष).
नवनिर्वाचित पदाधिकारी यांना खासदार नितीन पाटील व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
