कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण : शेतीसाठी एआय वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करा. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याशी आपली भेट व चर्चा झाली असून राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास आपण इच्छुक असल्याचे गेट्स यांनी सांगितले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शेतीशी निगडित माहिती आणि सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले शेतकरी ॲप आणि संकेतस्थळ विकसित करा. शेतकरी व कृषीकेंद्रीत ॲग्रीस्टॅक योजनांची आखणी व अंमलबजावणी करा. केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व योजनांचे एकत्रिकरण करून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. राज्यातील सुरू असलेल्या सर्व योजनांमध्ये जिथे सुधारणा आवश्यक आहेत त्याबाबतीत सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाने प्रमाणित बियाणांच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या सनियंत्रणासाठी ‘साथी पोर्टल विकसित’ केले आहे. महाराष्ट्रासाठी साथी पोर्टलवर सत्यतादर्शक बियाणे विक्री व वितरण होण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली विकसीत करण्यावर भर द्या. शेतकऱ्यांना ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. शेतीमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून माती विश्लेषण, कीटक आणि रोग व्यवस्थापन, पुरवठा साखळी विकसित करणे व हवामानाचा अंदाज घेण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात यावा. कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी खाजगी क्षेत्राकडून ज्ञान अवगत करावे. कृषी क्षेत्रात कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देण्यासाठी प्रयत्न करावा, त्याचबरोबर ई पीक पाहणी ॲपमध्ये काळानुरूप बदल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
राज्य व केंद्र शासनाच्या योजना राज्याची असलेली शेती क्षेत्रातील प्रगती, आव्हाने आणि सुधारणा याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. ई पीक पाहणी संदर्भात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजे शकुमार यांनी सादरीकरण केले.
बैठकीला मुख्यमंत्री यांच्या प्रधानसचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, महसूलचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचे प्रकल्पसंचालक परिमल सिंह उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!