जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वरती लवकरच उपलब्ध होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फलटण : शासनाच्या सर्व विभागांची माहिती  जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ उपलब्ध  होतील यामध्ये न्यायालय, रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करा, ‘स्वॅस’ या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवां बरोबर शासनाच्या उर्वरित सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिल्या. यावेळी ‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरण बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावी. शासनाच्या कोणत्या धोरणात्मक योजना आहेत त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्यावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https://cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच  उपलब्ध होणार आहे. तसेच हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून  माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.
माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस’ ही प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये  राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा. सदर प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा ‘सीएम डॅश बोर्ड व ‘स्वॅस'(S३WaaS)  ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!