
फलटण : सुलेखाताईंचं लिहणं आणि जाणं दोन्ही मनाला चटका लावणारं होत. त्यांनी लिहिलेले साहित्य अनुभव विश्वावर आधारीत होते. एक समाजसेविका ते कादंबरीकार हा त्यांचा प्रवास संघर्षमय होता. ही लेखकाचं घर पेलणारी आणि साखरशाळेतील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची आई होती. घरच्या परिस्थितीमध्ये पोटातील भूक पोटातच ठेऊन लेखणीतून नवे साहित्य जन्माला घालणाऱ्या सुलेखाताईंचा हा प्रवास म्हणजे आयुष्यभर सोसलेल्या कष्टाची गाथाच आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, वनविभाग, फलटण यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘साहित्यिक संवाद’च्या आधारभूत लेखिका स्व. सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या मालकाचं खातं, साळवाणाची खोप, लेखकाचे घर पेलताना, तसेच त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबरी यावरती संपादित केलेल्या सुलेखा शिंदे समाजसेविका ते कादंबरीकार या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी बेडकीहाळ बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र बोराटे, मसापच्या फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, साहित्यिक सुरेश शिंदे, शांताराम आवटे, ताराचंद्र आवळे, ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव, बाळासाहेब ननावरे, बापूराव शिंदे, गोविंद भुजबळ, राजेंद्र बोराटे, सुरेखा फुले, शशिकला नवले, रोहित वाकडे, राजेंद्र बोन्द्रे, जयवंत फुले, दादासाहेब कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिलीप जनार्दन पिसाळ व नसीम कादर पठाण यांना ‘सुलेखा सुरेश शिंदे साहित्य संवाद पुरस्काराने’ गौरविण्यात आले. मानपत्र, शाल, पुस्तके व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी नासिमा पठाण यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञतापर आपले मनोगत व्यक्त केले. ह.भ.प. युवा कीर्तनकार नवनाथ महाराज कोलवडकर यांनी आपल्या कीर्तन सेवेत सुलेखा शिंदे यांच्या साहित्यसेवेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद्र आवळे यांनी केले, आभार पत्रकार विकास शिंदे यांनी मानले. यावेळी साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्र, सहकार, राजकीय, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

