
फलटण : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन व इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ या पुरस्काराने मानेवाडी (ताथवडा) ता. फलटण येथील सौ. रेश्मा नितीन मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे समारंभ पूर्वक करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, डॉ. कमलताई गवई, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कला, साहित्य, वैद्यकिय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिडा क्षेत्रातील योगदानासाठी देशभरातील निवडक महिलांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण व सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन रेश्मा मोरे यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल रेश्मा मोरे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व तालुक्यातील बचत गटातील महिलांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे.

