
फलटण : ज्येष्ठ समर्थ भक्त आणि संत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. विजय लाड लिखित “पत्रे समर्थांची” आणि “समर्थकृत उपदेश पर काव्य” या दोन ग्रंथांचे प्रकाशन राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरि महाराज यांच्या हस्ते मोशी (पुणे) येथील वेदश्री तपोवन येथे झाले.
नुकत्याच झालेल्या श्रीदासनवमी या दिवशी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे पू. स्वामी गोविंद देव गिरि यांचा अमृत महोत्सवी सत्कार आणि ११ लाख ११हजार १११ रुपयांचा निधी अर्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी डॉ. लाड यांच्या या दोन ग्रंथांचे प्रकाशन स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले.
“समर्थांची पत्रे” या विवरणात्मक ग्रंथामुळे रामदास स्वामींनी छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच शिष्य प्रशिष्य यांचे सोबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भाने इतिहासाची पाने स्पष्ट होतील आणि समर्थांच्या उपदेश पर साहित्याचा एक वेगळा आयाम या ग्रंथामुळे समर्थ भक्तांच्या समोर आला आहे असे मत अयोध्येतील श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंद देवगिरी यांनी मांडले.

