प्रलंबित मागण्या पूर्ण करा ; फलटण येथे एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनाद्वारे मागणी

फलटण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने फलटण बस स्थानकात निदर्शने करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांची १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत देय होणारी थकबाकी अद्याप मिळाली नाही. २०१८ च्या महागाई भात्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा आदेश न्यायालयाने देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत बंद करून नवीन शिस्त व आवेदन पद्धत लागू करावी. भविष्य निर्वाह निधी च्या खात्यातून कामगारांना मागणी नुसार त्वरित उचल देण्यात यावी. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा यासह अन्य विविध मागण्या परिवहन महामंडळाकडे प्रलंबित आहेत. विविध प्रकारची थकबाकी वेळोवेळी मागणी करून देखीलही परिवहन महामंडळ त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. या प्रलंबित मागण्यांकडे परिवहन मंडळाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. ५ मार्च रोजी फलटण बस स्थानकामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष पोपट सोनावले, सचिव योगेश भागवत, संघटक सचिव गणेश सावंत, खजिनदार निरप्पा वाघमोडे, विभागीय सदस्य सुरेश अडागळे, बाळासाहेब जगताप, सुजित जगताप, संघटनेतील जेष्ठ नेते सुरेश पन्हाळे, दत्तात्रय कोळेकर, दिपक बेलदार, विलास डांगे, प्रवीण बोबडे, गणेश ननवरे, महेश भोसले, सागर चांगण, निलेश बोधे, नितीन शिंदे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!