फलटण : फलटण, खंडाळा तालुक्याचे पाणी कमी करून ते अन्यत्र देण्यात येऊ नये ही आपली ठाम भूमिका आहे. बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत असा जाहीर आरोप सभेत करणारे तालुक्यातील ‘पाणीदार’ व त्यांचे ‘आमदार’ आता फलटण व खंडाळ्याच्या वाटेचे जे पाणी जाऊ घातले आहे ते थांबवून दाखवणार का असा सवाल आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
फलटण येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामराजे यांनी सदर सवाल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम जवाहर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
निरा देवघर चे चार टीएमसी पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्यात येणार आहे. त्यामधील एक टीएमसी पाणी औद्योगिक वसाहतींकरिता व उर्वरित तीन टीएमसी पाणी शेतीकरिता देण्याचे नियोजन आहे. निरा देवघरच्या या वाढीव पाण्याचा प्रश्न गेली चार वर्ष खदखदत असतानाही लोकांसमोर मात्र या प्रश्नाचं गांभीर्य फारसं गेलेलं दिसून येत नाही, त्यामुळे मी माझे मुद्दे स्पष्टपणे (दि. १ मार्चच्या) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नीरा उजवा कालव्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडणार आहे असे स्पष्ट करून आमदार रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, गेली तीस वर्षे मी पाणी क्षेत्रात काम करत आहे. निरा देवघरच्या आहे या पाण्यामध्ये लाभक्षेत्र वाढविण्यापेक्षा आहे त्या पाण्यात आणखीन वाढ करून लाभ क्षेत्र वाढवणे केव्हाही योग्य ठरेल. केंद्र सरकारने मनात आणले तर पाणी निश्चितपणे वाढू शकते. त्यामुळे कृष्णा खोरे असो अथवा निरा खोरे त्यामधील पाणी कसे वाढेल हा प्रश्न सोडवण्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. जिथे पाणी आलेय, त्या पाण्यासाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, जिथे पुनर्वसन झाले आहे त्यांचे पाणी काढून दुसऱ्याला देणे हे नैसर्गिक न्यायाला व माणुसकीला धरून योग्य ठरणार नाही. त्यामुळे ज्या तालुक्यातील वाढीव गावांना पाणी देण्याची मागणी होत आहे, त्या गावांना त्यांच्या तालुक्याच्या वाट्याला येणाऱ्या पाण्यातूनच पाणी देण्यात यावे. त्या गावांच्या पाण्यासाठी फलटण व खंडाळा तालुक्याचे पाणी कमी करण्याचे कारण नाही. जर तुम्हाला लाभक्षेत्र वाढवायचे असेल तर ते जरूर वाढवा परंतु ते वाढवत असताना पाणीही वाढवा अशी मागणीही आमदार रामराजे यांनी यावेळी केली.
तो प्रस्ताव आजही पडूनच
निरा देवघरचा त्याग ज्या लोकांचा आहे त्या खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्याला, औद्योगिक वसाहतींना निरा देवघर चे वाचलेले पाणी देण्यात यावे. जास्तीच पाणी मिळतय त्यावर बैठक घ्यावी, दिल्लीमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे तीच लोक आज राज्यामध्ये आहेत, त्यांनी केंद्रस्तरावर जर उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यामध्ये आणखीन तीन ते चार टीएमसी पाणी वाढणार आहे हे आपण खात्रीपूर्वक दाखवू शकतो, आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता. तो प्रस्ताव आजही प्रशासनापुढे पडून आहे, त्यावर गेल्या पाच वर्षांमध्ये काहीही निर्णय घेण्यात आला नाही असेही आमदार रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
बंदिस्त पाईपलाईन हा विषय काही नवीन नाही !
मी स्वतः मंत्री असताना भूसंपादन करून कालवा काढायचा की बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुढे न्यायचे यावर विशेष चर्चा झाली आहे. त्यामध्ये असे सिद्ध झाले की कालवा हा कमी खर्चात होतोय म्हणून पाईपलाईन झाली नाही. त्यामुळे पाईपलाईनची कल्पना ही नवीन आहे अशातला भाग नाही. फलटण व खंडाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पूर्वीच औद्योगिक वसाहत, निरा उजवा कालवा, निरा देवघर, धोम बलकवडी या सर्व प्रकल्पांसाठी जमिनी दिलेल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या जमिनी किती घ्याव्यात याला मर्यादा होती. म्हणूनच त्या काळात मी पाईपलाईन साठी प्रयत्नशील होतो परंतु ते झाले नाही. परंतु आता पाणी व औद्योगीकरण आल्याने जमिनीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पाईपलाईन स्वस्त झाली म्हणून बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय अर्थात तो सुद्धा २०१४ सालीच घेण्यात आला आहे.
अशी परंपरा अडचणीची ठरेल !
निरा देवघरचे लाभक्षेत्र वाढवायचे असेल तर जरूर वाढवा, परंतु त्या अगोदर पाणी वाढवा. कारण निरा खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे. पाणी आणा आणि इतरांना ते वाटून टाका त्याबाबत आमचे काहीच म्हणणे नाही. ज्यांना कुणाला द्यायचे आहे त्यांना जरूर द्या. परंतु आमचं पाणी काढून ते दुसऱ्याला का ? आमचा खिसा रिकामा करून दुसऱ्याचा खिसा भरण्याची ही जी नवीन पद्धत सुरू झाली आहे, ती योग्य ठरत नाही आणि जर ही परंपरा सुरू झाली तर ती अडचणीची ठरेल असेही आमदार रामराजे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
निरा खोऱ्यातील दुष्काळी भागास पाणी मिळावे
सांगोला तालुका हा भाटघरच्या मूळच्या लाभक्षेत्रामध्ये नव्हता. तत्कालीन आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी अथक प्रयत्न करून पिण्याचे व शेतीच्या पाण्यासाठी चार महिने का होईना पुराचे पाणी आम्हाला द्या म्हणून त्या पाण्याची मान्यता मिळवून घेतली. आज सांगोला तालुक्याला पाच योजनांद्वारे पाणी मिळत आहे. परंतु असे असतानाही आम्ही सांगोल्याला कधीही विरोध दर्शवला नाही व आजही करीत नाही असे स्पष्ट करून केवळ कोणत्याही एका तालुक्यापुरता संकुचित विचार न करता, संपूर्ण निरा खोऱ्याचा जर विचार केला तर निरा खोऱ्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागाला जर पाणी देता आले तर त्या दृष्टीने पुढील काळात माझा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार रामराजे यांनी यावेळी सांगितले.

