
फलटण : युवांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या युवा धोरणांतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी “जिल्हा युवा पुरस्कार” शासनामार्फत देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३ मार्च पर्यंत अर्ज करावेत.
सन २०२३-२४ या वर्षात जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार जिल्ह्यातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार असून, पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख रुपये १०,०००/- (दहा हजार फक्त) व संस्थेस रुपये ५०,०००/- (पन्नास हजार फक्त) तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार आहे. यासाठी विहित अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे संपर्क साधावा.

