अगामी सहा महिने आम्ही मंजूर केलेल्या विकास कामांचे नारळ फोडणे एवढेच काम विद्यमान आमदारांना पुरेल ; अधिकाऱ्यांनो प्रोटोकॉल पाळा : माजी आमदार दीपक चव्हाण आक्रमक

फलटण : आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आपल्या माध्यमातून तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधी रुपयांची विकास कामे फलटण शहारासाठी मंजूर करून आणलेली आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांना अगामी सहा महिने केवळ आम्ही मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे नारळ फोडणे एवढेच काम पुरेल असा टोला लगावत आमच्या कामांचे श्रेय न घेता लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी थांबवावे तसेच अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळावा असा परखड इशारा माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिला आहे.
फलटण शहर व तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत विद्यमान आमदार व त्यांचे सहकारी यांचा जो काही श्रेयवाद सुरू आहे, त्याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सदर इशारा दिला आहे. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, माजी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे व किशोरसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले, फलटण शहर येथे आमच्यावतीने जी विकास कामे मंजूर झाली होती, त्यांची माहिती आम्ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. नगरोत्थान योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना यासह विविध योजनांद्वारे फलटण शहराच्या विकासाकरिता आम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आम्ही मंजूर करून आणलेली कामे आजही सुरू आहेत, मात्र सुरू असलेल्या कामांची अडवणूक करायची व त्याच कामांचे नारळ फोडायचे अशी काही पद्धत सुरू आहे ती खरंतर थांबवली पाहिजे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आपण स्वतः मंजूर करून आणलेली अनेक विकास कामे आहेत, त्यांचे श्रेय घेऊन कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे नारळ फोडण्याचे काम विरोधक करत असल्याचे निदर्शनास आणून देत. आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आपल्या माध्यमातून व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांना अगामी सहा महिने केवळ आम्ही मंजूर केलेल्या विकास कामांचे नारळ फोडणे एवढेच काम पुरेल असा उपरोधीक टोलाही यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांनी विद्यमान आमदारांना लागवला व या सर्व कामांचे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये व लोकांची दिशाभूल करण्याचे काम विद्यमान आमदारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी थांबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळावेत अन्यथा…
आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे नारळ फोडताना संबंधित विभाग अथवा संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आम्हालाही निमंत्रित करणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळायला हवेत, अन्यथा पुढील काळामध्ये अशाप्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या भाषेत समजावून सांगून त्यांनी कशा पद्धतीने वागले पाहिजे याची सूचना आम्ही त्यांना देऊ, त्यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांच्याशी कशा पद्धतीने वागायचे व बोलायचे याची भाषा आम्हाला कळते असा इशारा देत, अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीचे काम करताना ते पारदर्शक पद्धतीने, पक्षपाती न करता व नियमानुसार करावे अशी सूचनाही माजी आमदार दीपक चव्हाण यांनी समस्त अधिकारी वर्गाला यावेळी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!