
फलटण : फलटण आगारास नवीन बसेस मिळाल्याने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी व प्रवासी यांची प्रवासाची अडचण दूर होणार आहे याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. आज फलटण तालुक्यातील विकासाची गाडी सुसाटपणे निघाली आहे. या तालुक्याचे गतिमान नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ताकतीच्या जोरावरती फलटण तालुक्यामध्ये आज विकासाचे पर्व वहात आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.
फलटण आगारास प्राप्त झालेल्या १० नवीन बसेसचे पूजन आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे, विभागीय वाहतूक अधिक्षक ज्योती गायकवाड, प्रभारी आगार व्यवस्थापक राहूल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंतकुमार नाळे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सुर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरिक्षक सुखदेव अहिवळे, धिरज अहिवळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

फलटण आगाराला नवीन लालपरी मिळाव्यात याकरिता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ज्यावेळेस भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी पहिल्या भेटीतच फलटणसाठी वीस नवीन बसेस मंजूर करतो असे सांगितले होते व दिलेला शब्द त्यांनी पाळला त्याबद्दल त्यांचे सर्व प्रवाशांच्यावतीने आभार व्यक्त करून आमदार पाटील म्हणाले, गेल्या वीस वर्षांमध्ये फलटण येथे लाल परी आलेली नव्हती. त्यामुळे आज सर्वसामान्य जनतेची नव्या रूपातील लालपरी फलटण मधील रस्त्यावर धावल्याने मला मनापासून आनंद होत आहे. ग्रामीण भागातून शाळेला येणाऱ्या विद्यार्थिनींना कमी बसेसमुळे प्रवासादरम्यान त्रास होत होता. त्यांना एसटी बसची सेवा नियमितपणे मिळत नव्हती. सध्या आलेल्या नवीन बसेस व आगामी काळात येऊ घातलेल्या आणखीन नवीन बसेस यामुळे शालेय विद्यार्थ्यांची प्रवासाची अडचण दूर होणार आहे, याचा आपणास खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, प्रवासी यांनाही नवीन बसेस आल्याने फायदा होणार आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अपुऱ्या बसेसच्या संख्येमुळे ज्या ज्या ठिकाणी गाड्या जात नव्हत्या, त्या मार्गावरती त्या निश्चितपणाने चालू होतील असा विश्वासही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास चालक, वाहक, कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

