
फलटण : फलटण आगारास प्राप्त झालेल्या उत्तम दर्जाच्या व आधुनिक सुविधा असलेल्या नवीन बसेस मधून प्रवास करताना फलटणकरांना निश्चितपणे आनंद होईल. फलटण बदलतंय, फलटण सुधरतंय याची एक वेगळी प्रचिती फलटणकरांना या प्रवासातून जाणवेल असा विश्वास व्यक्त करून फलटणच्या विकासाच्या गाडीमध्ये सर्वांचे स्वागत आहे असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण आगारास प्राप्त झालेल्या १० नवीन बसेसचे पूजन आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आल्या नंतर त्यांनी फलटण शहारातून बसमधून फेरफटका मारला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे, विभागीय वाहतूक अधिक्षक ज्योती गायकवाड, प्रभारी आगार व्यवस्थापक राहूल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंतकुमार नाळे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सुर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरिक्षक सुखदेव अहिवळे, धिरज अहिवळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
फलटण बस स्थानकातील समस्या दूर करणे व प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे आमचे उद्दिष्ट्य आहे. आज दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत, लवकरच आणखीन दहा नवीन बसेस फलटण आगाराला प्राप्त होणार आहेत असे स्पष्ट करून रणजितसिंह म्हणाले, फलटण बस स्थानकाचा कायापालट करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आज नवीन बस मधून प्रवास करताना व उत्तम दर्जाच्या आणि विविध आधुनिक सुविधा असलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी फलटण आगारात दाखल झाल्याचा आपणास मनापासून आनंद होत आहे. फलटण आगारास नवीन बसेस मिळाव्यात यासाठी आमदार सचिन पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांनी ताबडतोब फलटण आगारासाठी २० बस मंजूर केल्या त्यामधील १० बस आत्ता दिल्या व १० बस नंतर येतील असे सांगत मागणीनुसार नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ग्रीन बसेस, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बसेसची देखील मागणी करण्यात आली असून अगामी काळामध्ये फलटण आगारास त्या प्राप्त होतील अशी आपणास खात्री आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रणजितसिंहाचा मोठेपणा !
फलटण आगारास प्राप्त झालेल्या नवीन बसेसचे पूजन करण्यात आल्यानंतर नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ बसची फीत कापून करण्यात येणार होता. त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका उपस्थित प्रवासी महिलेच्या हस्ते फित कापून सेवेचा शुभारंभ केला. यावेळी रणजितसिंह यांनी स्वतः ऐवजी एका प्रवासी महिलेच्या हस्ते फीत कापण्याचा दाखवलेला मनाचा मोठेपणा चर्चेचा ठरला.

