फलटण आगाराला मिळणार १० नवीन बसेस ; “कोहळा घेऊन दिला आवळा” प्रवाश्यांच्या प्रतिक्रिया

फलटण : सातारा जिल्ह्यात उत्पन्नात सातत्याने अग्रेसर राहत असलेल्या फलटण आगारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा कडून लवकरच दहा नवीन बसेस देण्यात येणार आहेत. आमदार सचिन पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे वीस बसेसची मागणी केली होती. त्यानंतर फलटण आगारास दहा नवीन बसेस देण्यात येणार आहेत.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील फलटण आगाराचे उत्पन्न पाहता परिवहन विभाग फलटण आगाराला “कोहळा घेऊन आवळा” देत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील फलटण आगार हे जिल्ह्यामध्ये उत्पन्नामध्ये सातत्यपूर्ण अग्रेसर राहिले आहे. परंतु या आगारात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत परिवहन महामंडळाने आजवर नेहमीच उदासीनता दाखवल्याचे दृश्य वेळोवेळी पहावयास व अनुभवयास मिळाले आहे. फलटण आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्याचबरोबर पाच हजारांपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी ग्रामीण भागातून फलटण शहरांमध्ये दैनंदिन ये जा करतात. आजमितीस फलटण आगारामध्ये ज्या बसेस उपलब्ध आहेत, त्यातील बहुतांश बसेस वापरा योग्य राहिल्या नसल्याच्या प्रतिक्रिया वेळोवेळी येथील प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. सद्यपरिस्थितीत फलटण आगारातील बसेची अवस्था अतिशय दयनीय व भयावह आहे. आगारातील चालक आपल्या कौशल्याने अशा बसेस मधून प्रवाशांना प्रवास घडवीत आहेत. आजही तालुक्यातील विविध मार्गांवर बसेस बंदावस्थेत उभारलेल्या व त्यातील प्रवासी अन्य बसेसची अथवा वाहनांची वाट पाहताना ताटकळत उभे असतानाचे दृश्य नेहमीच पहावयास मिळते. या पार्श्वभूमीवर फलटण आगारास नवीन बसेसची नितांत आवश्यकता असताना परिवहन मंडळाने मात्र त्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आमदार सचिन पाटील यांनी जानेवारी २०२५ मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फलटण आगारातील अनेक जुन्या बसेस सतत नादुरुस्त होत असल्याने शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातील प्रवासी यांची मोठी गैरसोय होत असल्याने व आगारातील बसेसची संख्या अपुरी असल्याने फलटण आगाराला तातडीने किमान नवीन वीस बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पत्राद्वारे केली होती. सदर पत्राची दखल घेऊन परिवहन मंडळाच्या महाव्यवस्थापकांद्वारे नजीकच्या भविष्यकाळात लवकरच नवीन एसटी बसेस उपलब्ध होणार आहेत. नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर फलटण आगारास बसेस वाटप करण्यात येतील असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच फलटण आगाराला दहा नवीन बसेस प्राप्त होणार आहेत, त्यापैकी १३ फेब्रुवारी रोजी सात तर १५ फेब्रुवारी रोजी तीन अशा एकूण दहा बसेस प्राप्त होणार असल्याची माहिती फलटण आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांनी दिली आहे.

“कोहळा घेऊन दिला आवळा” !
फलटण आगारास आजमितीस ग्रामीण भाग व लांब पल्ल्यांसह तसेच प्रासंगिक करार यासाठी दैनंदिन ११० बसेसची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामध्ये नीम आराम १०, शिवशाही ५ व साध्या ९५ बसेसची आवश्यकता भासत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण या भागात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना सोयीच्या ठरतील अशा लांब पल्ल्याच्या व जलद बसेस फेऱ्या फलटण आगारातून सुरू केल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल, कारण या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बारामती व सातारा गाठावे लागते. वास्तविक फलटण आगाराला जिल्ह्यातील उत्पन्न पाहता त्यानुसार नवीन बसेस मिळण्यात प्राधान्य मिळायला हवे होते, परंतु तसे होत असताना दिसून येत नाही. त्यामुळे मराठी भाषेत ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ ही म्हण प्रचलित असली तरी फलटण आगाराबाबत परिवहन मंडळ ‘कोहळा’ घेऊन ‘आवळा’ देत असल्याची उपरोधीक प्रतिक्रिया प्रवाशीवर्गामधून व्यक्त होत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!