
फलटण : के. बी. एक्स्पोर्ट्स व के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीच्या माध्यमातून सचिन यादव यांनी केलेले काम शेती व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील काम कौतुकास्पद व गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.
लोणंद, ता. खंडाळा येथील शेतकरी मेळाव्यात के. बी. एक्स्पोर्ट्स व के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे संचालक सचिन यादव यांना कृषि उद्योजक आणि चीकफीड कंपनीचे सतीश कोंडे यांना कृषिरत्न पुरस्काराने राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रा. विक्रम कड, के. के. गायकवाड, सौ. सुजाता यादव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पादने युरोपात निर्यात करताना घातक रासायनिक कीटक नाशकांचे त्यामधील अंशामुळे निर्यातीत अडथळे निर्माण होतील याची चाहूल लागताच सचिन यादव यांनी तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतीच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनविणाऱ्या के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. यामुळे आज शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषी मालाचे उत्पादन घेण्यासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला असल्याने या औषधांच्या वापरामुळे शेतकऱ्यां प्रमाणे कृषी उत्पादने, म्हणजेच धान्य, फळे भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळणे सोपे झाले असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
एआय टेक्नॉलॉजी (कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान) अद्याप नवीन असल्याने त्याबाबत फारशी माहिती नाही, तथापि त्याची उपयुक्तता समजावून घेतल्यानंतर सर्वच क्षेत्रात हे नवे तंत्रज्ञान वापरले जाईल त्यावेळी शेती क्षेत्र त्यापासून दूर राहू शकणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून त्याचा अभ्यास करुन ते आत्मसात करावे असे आवाहनही राजेंद्र पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.
