शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

फलटण : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात या योजनेतील फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सोपान टोणपे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.
या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, या योजनेमूळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल. पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!