मुधोजी महाविद्यालयात “दे धक्का” चे वर्चस्व ; “आम्ही सगळे एकत्र” व “जगा आणि जगू द्या” हेही ठरले चर्चेचे !

फलटण ता. २५ : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी “अभिरुप निवडणूक प्रक्रिया” हा प्रयोगात्मक उपक्रम राबविण्यात आला. या नुसार महाविद्यालयात मुलांनी पक्षांची स्थापना करून निवडणूक लढविली व जिंकली सुद्धा.
मुधोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभागाची प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “अभिरुप निवडणूक प्रक्रिया” या प्रयोगात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘दे धक्का’, ‘आम्ही सगळे एकत्र’ व ‘जगा आणि जगू द्या’ अशा तीन पक्षांची स्थापना केली. यावेळी रबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये दे धक्का पक्षाच्यावतीने बीए भाग १ चे सिद्धांत निकाळजे, आम्ही सगळे एकत्र मधून बीए भाग २ च्या श्रुती जगताप तर जगा आणि जगू द्या च्या वतीने बीए भाग ३ मधील मयूर बनकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये ३५८ विद्यार्थिनी व १३५ विद्यार्थी असे एकूण ४४७ विद्यार्थी, १०१ प्राध्यापक व कर्मचारी अशा एकूण ५४८ जणांनी मतदार म्हणून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. या निवडणुकीच्या निकालात सिद्धांत निकाळजे यांना २६८, मयूर बनकर यांना १८१ तर श्रुती जगताप यांना ७९ मते मिळाली. दे धक्काचे उमेदवार सिद्धांत निकाळजे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ८७ मतांच्या मताधिक्याने विजय मिळविला. या प्रक्रियेत २० मते अवैध ठरली.
या निवडणूक प्रक्रियेत केंद्र प्रमुख म्हणून जय जाधव, मतदान अधिकारी म्हणून सोहम धुमाळ, निकिता गायकवाड, साक्षी कदम, पोलीस शिपाई म्हणून नम्रता लोखंडे, प्रिया बोराटे व शिपाई म्हणून करण राऊत यांनी काम पहिले. यावेळी फलटण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ८ च्या पाचवीतील विद्यार्थिनींनी अमोल खंकाळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पाहून शिकण्याचा अनुभव घेतला. या प्रयोगात्मक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजून घेण्याची आणि निवडणूक प्रक्रियेतून शिक्षण घेण्याची महत्वपूर्ण संधी मिळाली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी.पी. शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. गिरीष पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. प्रा. अक्षय अहिवळे आणि प्रा. प्रियांका शिंदे यांचेही या उपक्रमास सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!