फलटण : आळंदी पंढरपूर पालखी महामार्गांवर असणाऱ्या विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत २५ फाटा येथील एका उसाच्या शेतात सडलेल्या व अर्धवट अवस्थेमधील मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तू मिळून आल्या आहेत. प्राथमिक दर्शनी हा मृतदेह महिलेचा असल्याचे दिसून येत असून या ठिकाणी घडलेला प्रकार खुनाचा आहे की नरबळीचा या बाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. पोलीसांकडून मात्र हा प्रकार खुनाचा की नरबळीचा याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
विडणी ता. फलटण गावच्या हद्दीमध्ये २५ फाटा येथे प्रदीप महादेव जाधव यांची उसाची शेती आहे. शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी दहाच्या सुमारास जाधव हे शेतात गेले असता, त्यांना सडलेल्या व अर्धवट अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती गावच्या पोलीस पाटील शीतल नेरकर यांना दिली, त्यांनी तातडीने ही घटना ग्रामीण पोलीसांना कळविली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. मृतदेह आढळून आलेल्या परिसराची त्यांनी कसून पाहणी केली. यावेळी पोलीसांना तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तू मिळून आल्या, सुमारे दोनशे मिटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या पाटात एक कवटीही आढळून आली. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्यासाठी हा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला असून पुराव्यांचा शोध घेण्यासाठी येथील व आसपासचा ऊस तोडण्याच्या सूचना पोलीसांनी संबधित कारखाना प्रशासनास केल्या आहेत.
घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक राहूल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दुपारच्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी व सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.
दरम्यान विडणी येथे आढळून आलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने तसेच कंबरेखालचा भाग व कवठी मिळाल्याने संपूर्ण मृतदेह शोधण्याचे व त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याचबरोबर ही घटना जेथे घडली तेथे फारशी वर्दळ नसते. मृतदेहाच्या परिसरात तेलकट साडी, स्कार्फ, काळी बाहुली, केस, दिव्याची वात, कुंकू, गुलाल, सुरी अशा वस्तू मिळून आल्याने हा खुन आहे की नरबळी याचाही तपास करून त्याचा छडा लावण्याचेही खडतर आव्हान पोलिसांसमोर आहे.
या घटनेची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली असून, जर याबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.