फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे कलाविष्कार विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित ‘भारतीय संस्कृतीचे दर्शन’ सांस्कृतिक शोभा यात्रेत विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील लोकसंस्कृती व लोकनृत्याचे सादरीकरण करून विविधतेतून एकता हा संदेश दिला.
विशेषकरून विद्यार्थ्यांनी आसाम मधील बिहू संस्कृती, पंजाबी भांगडा, काश्मिरी संस्कृती, पश्चिम बंगाल – दुर्गापूजा, दाक्षिणात्य भारतातील करघम, तामिळनाडूतील कावडीअट्टम, गुजरात मधील गौर बंजारा तसेच महाराष्ट्रातील आग्री कोळी, लेझीम, धनगरी नृत्य, मंगळागौर, ज्योतिबाची सासन काठी, गोव्यातील दिवली नृत्य, गौंड आदिवासी, दिंडी, शिवराज्याभिषेक, शिवजन्मोत्सव आदी संस्कृतीचे सादरीकरण करून एकतेचा व संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला. तसेच पारंपारिक दिनास विविध राज्यातील वेशभूषा करून संस्कृतीचे प्रस्तुतीकरण केले यात विशेषतः पोतराज, वासुदेव, पिंगळा, शेतकरी, जवान, वारकरी सांप्रदाय, आराधी, स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज, गझी ढोल, लेझीम तसेच मंगळागौर पूजा आदी पारंपारिक वेशभूषा करून प्रचंड उत्साहात युवा जल्लोषात व मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. पी एच कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले. समिती सदस्य प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा. प्रियांका देशमुख, प्रा. सचिन दोशी, प्रा. गायत्री पवार आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व शाखाप्रमुख , विभागप्रमुख , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.