फलटण ते प्रयागराज कुंभमेळा संजय जामदार यांचा सायकल प्रवास ; आज यवतमाळ येथे मुक्काम

फलटण : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा, यमुना व अदृश्य सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर भरलेल्या पावन कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी कोळकी ता. फलटण येथील पत्रकार संजय जामदार हे सायकलहून प्रयागराजकडे रवाना झाले आहेत. कुंभमेळ्यानंतर ते काशी, अयोध्या व अन्य धार्मिक स्थळांनाही भेटी देणार आहेत. या धार्मिक यात्रेच्या निमित्ताने जामदार हे सुमारे साडे तीन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करणार आहेत.
कोळकी ता. फलटण मधील मालोजीनगर येथील हनुमान मंदिर येथून संजय जामदार यांनी आपल्या सायकल यात्रेचा शुभारंभ केला. फलटणहून पंढरपूर, सोलापूर,
तुळजापूर, लातूर, नांदेड, माहूरगड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, जबलपूर, कटणी, रिवा ते प्रयागराज कुंभमेळा असा ते सायकल प्रवास करणार आहेत. परतीचा सायकल प्रवास ते प्रयागराज, काशी, गोरखपूर मठ (श्री योगी आदित्य नाथ), अयोध्या, चित्रकुट, झाशी, शिवपूरी, उज्जैन (श्री महांकालेश्वर), इंदौर, माहेश्वर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी), मंडलेश्वर, ओंकारेश्वर, कारंजा लाड (श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान), मुक्ताईनगर (श्री मुक्ताबाईंचे स्थान), घृष्णेश्वर, अहिल्यादेवी नगर, दौंड, बारामती, फलटण, कोळकी असा करणार आहेत. याव्यतिरिक्त या मार्गांवरील जवळपास असणाऱ्या अन्य धार्मिक स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

संजय जामदार यांनी या पूर्वीही २०१४ साली १०८ दिवसांची सुमारे साडेतीन हजार किलोमीटर अंतराची माँ नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली आहे.
२०२१ सालामध्ये कोळकी येथून सायकलवरून त्यांनी सायकलवर शंभर दिवसात माँ नर्मदा परिक्रमा पूर्ण या सायकल यात्रेत त्यांनी सुमारे साडेपाच हजार किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवरून केला आहे. २०२२ साली संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधी दिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी सुमारे दोन हजार किलोमीटरची सायकल धर्म यात्राही संजय जामदार यांनी पूर्ण केली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी वेळोवेळी विविध धार्मिक स्थळाना भेटी देऊन तेथील धार्मिक महत्व जाणून घेतले आहे.

सदर सायकल यात्रेच्या प्रवासा दरम्यान जामदार यांनी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, नांदेड येथे मुक्काम केला आहे. नांदेड येथे त्यांचा नांदेड क्लब यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या सायकल यात्रेच्या सातव्या दिवशी त्यांनी ब्राम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरु श्री तुकामाई यांचे समाधी स्थळ येहळेगाव ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे दर्शन करून मुक्काम केला. आठव्या दिवशी (दि. १४) उमरखेड येथे श्री तुकामाईंचे गुरु श्री चिन्मयस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते माहूरगड येथे मुक्काम केला. आज (दि. १५) ते यवतमाळ येथे मुक्काम करणार आहेत.
कोळकी येथे सायकल यात्रेचा प्रारंभ करताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, अरविंदभाऊ शिंदे, किसनराव जाधव, अजित मुळीक, अक्षय मुळीक, विवेक लाटे, प्रवीण धनवडे, बी. जी. कुंभार, केदार गोसावी, राजेंद्र जगदाळे, मल्लिकार्जुन जामदार, हर्षवर्धन बोळे आदींची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!