फलटणच्या श्रीराम मंदिरात ओवसा घेण्यासाठी हजारो महिलांची गर्दी

फलटण : फलटण येथील संस्थानकालीन श्रीराम मंदिर येथे मकर संक्रांती दिवशी ओवसा घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. फलटण शहर व तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांच्या तालुक्यातील हजारो महिलांनी एकमेकींना विडे देऊन ओवसा दिला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर व भोवतालचा परिसर महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मकर संक्रातीला सीतामाईचे दर्शन घेवून तीच्याकडून अखंड सौभाग्याचा ओवसा घ्यायचा अशी प्रथा व परंपरा असून त्यामुळे अखंड सौभाग्य लाभते अशी श्रध्दा महिलांमध्ये आहे. त्यामुळे मकर संक्रांतीदिवशी पारंपरिक वेषभूषेमध्ये अनेक महिला तीळगुळ घ्या गोड बोला अशा स्नेहपूर्ण उद्गाराने एकमेकींना शुभेच्छा देत फलटण शहरातील मुधोजी मनमोहन राजवाड्यालगत असलेल्या संस्थानकालीन श्रीराम मंदिराकडे येताना दिसत होत्या. ओवसा घेण्यासाठी नेहमी सकाळपासूनच महिलांची गर्दी जमलेले चित्र असते, परंतु यंदा मात्र पुण्यकाळ सकाळी नऊ नंतर असल्याने दुपारनंतर महिलांच्या गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. श्रीराम मंदिर येथे सीतामाईला ओवासा देण्यासाठी व श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेण्यासाठी दुपारी महिलांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या, रांगेद्वारे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मंदिराशेजारील दत्त मंदिर आणि श्रीराम मंदिर परिसरातील रिकाम्या जागेत महिला विडे मांडून, पूजा करीत होत्या. संक्रांतीमध्ये (मातीची सुगडे) तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, पावटा, घेवडा शेंग, हरभरा घेवून सुगड्या व वसा पूजन करुन महिला एकमेकींच्या ओट्या भरुन शुभेच्छा देत होत्या, त्यामुळे मंदिर परिसरात हळदी कुंकवाचा सडा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मकर संक्रांतीला श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाडा परिसरात गर्दी होत असल्याने नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि फलटण नगर परिषदेने मंदिर परिसर स्वच्छ करुन सुलभ दर्शनाची व्यवस्था केली होती.
गर्दीवर नियंत्रण ठेवून सर्वांना सहजतेने दर्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत रांगेने व शिस्तीने जाण्यासाठी बॅरेगेटींग लावून व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन घेतल्यानंतर दत्त मंदिरासमोरील दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आल्याने येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध असल्याने प्रवेशद्वारात होणारी गर्दी टाळण्यात यश आल्याचे दिसून आले. दुपार नंतर सीतामाईच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची रांग श्रीराम मंदिर, मुधोजी मनमोहन राजवाडा, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, जब्रेश्‍वर मंदिर या बाजूने गजानन चौकापर्यंत पोहोचली होती. मंदिर परिसरात होणारी चुडा, बांगड्यांची, लहान मुलांची खेळणी, मेवा मिठाई आणि वाणवस्याच्या साहित्यासह सुपारी, हळद कुंकू वगैरे वस्तुंची दुकाने गजानन चौक, शिंपीगल्ली व पवार गल्ली परिसरात लावल्याने मंदिरासमोर होणारी गर्दी टळून येणाऱ्या महिलांना सहजतेने मंदिर प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून आले. श्रीराम मंदिरा नजीक असलेल्या प्रसिद्ध जबरेश्वर मंदिरातही महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

श्रीराम मंदिर व मंदिर परिसरामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व दर्शन रांग सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी पोलिसांना अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या स्वयंसेवकांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर समोरील बाजूस मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था, फलटण, महाराष्ट्र राज्य व कादंबरी वाचनालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमंत मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना मोफत पाणी व तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
पोलिस प्रशासनाच्या वतीने या परिसरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचे नेटके नियोजन करण्यात आले होते व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान ग्रामीण भागामध्ये गावोगावीच्या महिलांनी गावांमधील मंदिरे, फलटण बरोबरच सीताबाई (कुळकजाई), औंध, पंढरपूर, चाफळ आदी ठिकाणीही जाऊन ओवसा घेतला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!