फलटण : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरांमुळे ग्रामविकासाला चालना मिळते. अशा शिबिरांच्या माध्यमातून स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा जो संदेश देण्यात येतो तो सर्वांसाठी प्रेरणा देणारा ठरतो असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत वडले ता. फलटण येथे ३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा शुभारंभ संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, वडले सरपंच डॉ. संतोष लाळगे, उपसरपंच स्वाती मोरे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एच कदम, सी डी पाटील, ॲड. ए के शिंदे, प्रा. एस एम लवांडे आदी मान्यवरांची उपास्थिती होती.
श्रमसंस्कार शिबिरांमुळे विदयार्थ्यांची नाळ ग्रामीण जनतेशी जोडली जाते. विद्यार्थ्यांनी श्रमदान केल्याने त्यांना अशा शिबिरांच्या माध्यमातून श्रमसंस्काराचे धडे मिळतात व हे संस्कार त्यांना पुढील वाटचालीसाठी दिशा देणारे ठरतात असे प्राचार्य डॉ. पी एच कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रियांचे आरोग्य व आहार, फळबाग लागवड प्रकल्प व वृक्ष संवर्धन काळाची गरज, भारताचा सक्षम युवक, व्यसनमुक्ती जनजागृती आदी विषयांवर अविनाश चव्हाण, मुकुंद मोरे, डॉ. सुधीर इंगळे, डॉ. अभिषेक मोरे, डॉ. अलका पोळ, डॉ. माधवराव पोळ, डॉ. नीलिमा दाते, आदित्य अविनाश, दादा वाघमोडे, प्राचार्य रवींद्र येवले आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शिबीर कालावधीत पर्यावरण संवर्धन, स्री सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, मतदान जनजागृती, स्वच्छ व सुदृढ भारत अभियान अशा विषयांवर प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या.
समारोप प्रसंगी शिबिरार्थी अस्मिता गोरे, निखिल तारळकर, समिक्षा शिलवंत आदींनी शिबिरात आलेले आपले अनुभव सांगितले.
शिबिरातील सहभागी मुलींच्या निवासाची उत्तम सोय केल्याबद्दल शिवाजी सोनवलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुधोजी महाविद्यालयाचे सीडीसी सदस्य, विभाग प्रमुख प्राध्यापक, वडले ग्रामस्थ उपस्थित होते.