फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणच्यावतीने सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांसाठी आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे प्रा. गोविंद भाऊसाहेब वाघ, द्वितीय क्रमांक तिरकवाडी (ता.फलटण) येथील जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सौ.सीमा गोडसे – मुळीक, तृतीय क्रमांक विभागून निंभोरे (ता.फलटण) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे राजेंद्र अहिवळे व मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे प्रा. सुधाकर वाकुडकर यांना प्राप्त झाला आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृति करंडक व रुपये १,५००, द्वितीय क्रमांकास रुपये १,०००, तृतीय क्रमांकास रुपये ५०० रुपये रोख पारितोषिक, एक ग्रंथ व प्रशस्तीपत्रक देवून आगामी यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी प्राचार्य शांताराम आवटे, माजी उपशिक्षक महादेव गुंजवटे, ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी काम पाहिले.
यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण चे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी केले आहे.