फलटण येथे आज आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार ; विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित राहणार

फलटण : फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय यंत्रणांकडील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि त्यांच्या समस्या, अडचणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर जनता दरबाराबाबत आ. सचिन पाटील यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना पाठविलेल्या पत्रात आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे शासन दरबारात प्रलंबित असणाऱ्या अडचणी, प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या जनता दरबाराचे आयोजन करणे आवश्यक असलेने प्रत्येक विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना जनता दरबारात उपस्थित राहण्याच्या सूचना देवून आपल्या कार्यालयामार्फत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात यावे व बैठकीचे नियोजन करणेकामी सहकार्य करावे असे कळविले होते. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्याबाबत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सदर जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याचे कळविले असून आपण स्वतः उपस्थित रहावे, प्रतिनिधी पाठवू नये असे लेखी कळविले आहे. आ. सचिन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबारात उपस्थित करावयाचे प्रश्न आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह दाखल करण्याचे आवाहन फलटण तालुक्यातील नागरिकांना यापूर्वीच करण्यात आले होते. त्यानुसार दाखल तक्रारी, प्रश्नाची मांडणी या जनता दरबारात करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!