अपशिंगे (मिलिटरी) गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध : मंत्री शंभूराज देसाई

फलटण : अपशिंगे (मिलिटरी) या गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील सेहेचाळीस जवान शहिद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य सैन्य दलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांच्या या बलिदानामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. या गावच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही माजी सैनिक कल्याण, पर्यटन, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे आजी-माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी मंत्री देसाई बोलत होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, गावचे सरपंच तुषार निकम, माजी कॅप्टन उदाजीराव निकम, शंकर माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील कुटुंबातील एकतरी व्यक्ती देश सेवा करीत आहेत. या गावातील माजी सैनिकांच्या शार्याची माहिती बाहेरील लोकांना व्हावी यासाठी वॉर मेमोरियल तयार करण्यात येईल. यातून युवा पिढीला प्रेरणा मिळून देश सेवेसाठी सैन्यदलात जातील, असा विश्वासही व्यक्त करून ना. देसाई म्हणाले, या गावावर आम्हाला प्रेम, आपुलकी व आदर आहे. गावातील रस्ते, शाळा व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. गावच्या सर्वांगिण विकासासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्यात येईल असे ही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
मेळाव्यास आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!