फलटण : पर्यावरण संवर्धन हे व्रत एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजरित्या हस्तांतरित झाले पाहिजे. मुळात ‘अन्न हेच औषध’ ही आपली भारतीयांची मूळ संकल्पना आहे, हे विसरून चालणार नाही. या ज्वलंत प्रश्नावर विधायक दृष्टिकोनातून ऊसाची पाचट न जाळता शेतातच कुट्टी करून खत निर्मिती करावी, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशिल शेतकरी उद्धवराव बाबर यांनी केले आहे.
बाबर यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आपण पर्यावरण रक्षणासाठी व संवर्धनासाठी काम करत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास मानवाच्या मुळावर येऊ लागला आहे. बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन अनेक संकटांना निमंत्रण देत आहे. मनुष्य प्राण्याने हव्यासापोटी पर्यावरणाचे अतोनात नुकसान केलेले आहे. अधिकाधिक अन्न उत्पादन करण्याच्या नादात जमिनीचे आरोग्य बिघडवले आहे. रसायन विरहित पारंपारिक शेतीतून तयार होणारे अन्नच भावी पिढीचे रक्षण करू शकते.
उसाचे पाचट न जाळण्याचे फायदे :
▪️ ऊसाचा पाला न जाळता एक आड सरीमध्ये ठेवावा किंवा पाचट कुट्टी करावी. त्यामुळे त्याचे मोठे फायदे आहेत. त्यामुळे हेक्टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याचे व सुमारे शंभर ते दिडशे युनिट विजेची बचत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
▪️ पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलनी व मशागतीच्या खर्चात व श्रमात पन्नास टक्केची बचत होत आहे.
▪️ शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्यातील अंतर वाढते व जिवाणूंची संख्या वाढते तसेच उसाची चांगली वाढ होते.
▪️ ऊस क्षेत्रातून एकरी पाच ते सहा टन पाचट मिळते. त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत कोणतीही वाहतूक न करता विना खर्चात ऊस पिकाला शेतातच मिळते.
▪️ उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाची वाढ होते.
▪️ पाचटाच्या पूर्ण अच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.
▪️ पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा नत्र चाळीस ते पन्नास किलो, स्फुरद वीस ते तीस किलो, पालाष पंच्याहत्तर ते शंभर किलो ऊसाला उपलब्ध होते.
▪️ जमिनीचे तापमान थंड राखले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. शेतात गांडुळांची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते तसेच पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्मात सुधारतात व जलधारण शक्ती वाढते.
▪️ पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बनडाय ऑक्साइड वायू बाहेर पडतो, त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, वैशाखी मूग, उडीद किंवा चवळीची पिके घेतल्यास अतिरिक्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपीकता सुधारते.
“पाचट न जाळल्यामुळे महत्त्वाचे फायदे होत असून पर्यावरणाला रक्षणाला फार मोठा हातभार लागत आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचे पाचट न जाळता शेतातच पाचट कुट्टी करून खत निर्मिती करावी व पर्यावरण संवर्धनाला व जमिनीची सुपीकता वाढण्यास हातभार लावावा.”
उद्धवराव बाबर,
प्रगतशील शेतकरी देवापूर (माण).