फलटण : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, शेती शाळा, जिंती नका, फलटण येथे दि. दोन जानेवारी ते सहा जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ चे भूमिपूजन नितीन गांधी, डॉ. सी. डी. पाटील व अरविंद निकम यांच्या हस्ते पार पडले.
सदर कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कृषि क्षेत्राशी निगडित दोनशेहून अधिक कृषि निविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषि प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती प्रदर्शनात एकाच ठिकाणी मिळणार आहे. या कृषि प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवर चर्चा सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे, त्या मध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषि उद्योजकता विकास, दुग्ध व्यवसाय आदी विषयांचा समावेश असणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटणचे प्राचार्य एस. आर. वेदपाठक, पद्मभूषण डॉ. सुखात्मे कृषि तंत्र निकेतन, फलटणचे प्राचार्य जे. एस. माने, पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. इंगवले यांच्यासह श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.