फलटण : फलटण – कोरेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या आणि या भागातील वाढत्या औद्योगिकीकरण, व्यापार व नियमीत दळणवळण यासाठी मौजे आळजापूर, ता. फलटण येथील रेडे घाटाचे काम पूर्णत्वास नेण्याची मागणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेडे घाटाचे काम प्राधान्याने मंजूर करुन घेऊन पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली.
आळजापूर येथे अलीकडे औद्योगीक व उद्योग व्यवसायात वाढ होत आहे, त्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता आहे. पूर्वी आळजापूर गावातून कोरेगाव तालुक्यात जाण्यासाठी एक मार्ग होता, जुन्या काळात त्यामार्गाने ये-जा सुरु होती. परंतू त्या मार्गावरील रेडे घाट रस्ता खराब झाल्याने व तो भाग वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्याची दुरुस्ती करता आली नाही, परिणामी हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. गेल्या ३०-४० वर्षात अनेक लोकप्रतिनीधींनी येथे भेटी दिल्या, त्यांचेकडे या रस्त्याची मागणी करण्यात आली परंतु प्रत्यक्षात काम कधीच सुरु झाले नसल्याने आळजापुर व पंचक्रोशीतील लोकांना वाहतुकी साठी उपयुक्त असलेल्या या रस्त्यापासून वंचित रहावे लागले आहे.
आता आपले महायुतीचे केंद्र, राज्य सरकार आणि तालुका पातळीवर आपले नेतृत्व असल्याने आळजापूर पंचक्रोशीच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आपल्या माध्यमातून पाठपुरावा करुन मार्गी लागल्यास या भागासह कराड, कोल्हापूर, कोरेगाव येथून रेडे घाटातून लोणंद बाजार पेठेत होणारी वाहतुक सोपी होईल. तसेच या भागात उद्योग व्यवसाय सुरु होवून नवीन रोजगार निर्मिती होईल.
या रेडे घाटामुळे कोरेगावसह पुढे जाणारे अंतर कमी होणार असल्याने कोरेगाव बाजूने रस्त्याचे काम सुरु आहे, फलटण बाजुने रस्ता पुर्ण करण्यासाठी या घाटाचे काम पुर्ण होणे गरजेचे असल्याने आपण या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संतकृपा उद्योग समुहाचे प्रमुख विलासराव नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देताना जयवंत केंजळे, राजेंद्र नलवडे, चंद्रकांत पवार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी संचालक मंडळ आणि ग्रामस्थांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.