फलटण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार असल्याचे स्पष्ट होताच. फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील महायुतीचे नवे सरकार जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ताकतीने काम करेल असा विश्वास व्यक्त करून महायुतीला राज्यभरात व्यक्त केलेल्या पाठबळाबद्दल महायुतीचे आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या गट नेते पदी आज देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आल्याने, महायुतीच्या नवीन सरकारमध्ये उद्या तेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज फलटण शहरातआमदार सचिन पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुपारी दोनच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार सचिन पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
युतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गट नेतेपती निवड झाली आहे. महाराष्ट्रात उद्या युतीचे सरकार स्थापन होणार असून शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण ताकतीने विश्वास ठेवल्याने महायुतीला मोठे यश मिळाले आहे असे सांगून आमदार पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, व्यावसायिक, सर्वसामान्य जनता व मुख्यत्वे करून लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर आमचे नेते अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांचाही उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सहभाग असणार आहे, उर्वरित मंत्रीमंडळाची देखील लवकरच रचना होईल. नवीन युती सरकार जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ताकतीने काम करेल असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, जाकीरभाई मणेर, अमोल सस्ते, राजेश हेंद्रे, संदीप चोरमले, राजेंद्र निंबाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच फाटक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.