फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषी दुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत पाडेगाव फार्म येथे फळबागेसाठी आवश्यक असणारी खते व त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिले.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील मुलांनी पाडेगाव फार्म येथील डॉ. प्रमोद अडसूळ यांच्या शेतात जाऊन डाळिंब या पिकावरती खत व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या प्रात्यक्षिकात कृषीदुतांनी एनपीके खतांचा वापर केला, त्यामध्ये पाचशे ग्रॅम १०:२६:२६, पन्नास ग्रॅम मायक्रो-नुट्रेंट, एक किलो दुय्यम अन्नद्रव्य, दोन किलो पीआरओएम प्रती झाडासाठी वापरण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी रिंग पद्धत वापरण्यात आली. साधारणत: फळ झाडापासून एक ते दीड फूट अंतरावर वर्तुळ आकारात आठ सेंटीमीटर उंचीचे कुदळ व खोऱ्याच्या मदतीने खोदकाम करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिक आर्यन जगताप, श्रीतेज कोलते, प्रतीक चौधरी, प्रज्वल यादव, सुजीत म्हेत्रे, विराज तोडकर, अमित फाळके व निखिल गोवेकर या कृषी दुतांनी सादर केले. यावेळी डॉ. प्रमोद अडसूळ, सचिन कुडाळे, सदाशिव जाधव, प्रमिला लकडे, सुरेखा गोरे व अन्य शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितीषा पंडित, प्रा. निलिमा धालपे व प्रा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले.