भारताची आजची प्रगती केवळ संविधानामुळेच – डॉ. प्रभाकर पवार

फलटण : ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखाड्यातून भारत देश मुक्त झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या संविधानाने देशाला मजबूत अशी जीवनपद्धती, कायदेपद्धती व विकास पद्धती दिल्यामुळेच आज भारत देशात जी काही प्रगती दिसत आहे ती केवळ भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळेच आहे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या ‘संविधान दिन’ गौरव पर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल टिके होते तर प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. अक्षय अहिवळे व प्रा. प्रियांका शिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय लिखित संविधान असून त्याला जगभरातील ज्ञान शाखा, विद्यापीठे व घटना तज्ञांनी गौरवलेले आहे. २६ नोव्हेंबर १९५० रोजी ते मंजूर करण्यात आले, त्या ठरावावर संविधान सभेच्या २८४ सदस्यांच्या सह्या आहेत. संविधानाची व्यापकता प्रत्येकाने अभ्यासाने माहीती करून घेतली पाहिजे. मानवी मूल्य आणि मानवी गरजा व त्यावरील उपाय योजना याचे इत्यंभूत त्वज्ञान भारतीय संविधानात सामावलेले दिसून येते असे सांगून डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, प्रत्येक भारतीयाने एक जबाबदार नागरिक म्हणून राज्यघटनेचे संरक्षण करून त्याची बूज राखली पाहिजे व भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. अनेक धर्म, जाती, पोटजाती, वंश, पंथ, सांप्रदाय असणाऱ्या आपल्या देशातील समाज व्यवस्थेला एका रेशमी धाग्यात बांधून विकासाचा मार्ग दाखवण्याचे महान कार्य त्यांनी संविधानाची निर्मिती करून पूर्ण केले आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संयोजन प्रा. अक्षय अहिवळे यांनी केले. संविधानाच्या उद्दिष्ट पत्रिकेचे सार्वजनिक वाचन एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन वेदांत मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पिचड यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!