फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी मुरूम ता.फलटण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले असून ग्रामस्थ्यांच्यावतीने या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले आहे.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे कृषिदूत मुरूम येथे वास्तव्यास राहून शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांच्यावतीने शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञाना विषयक विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. विद्यार्थी गावामध्येच वास्तव्य करणार आहेत. या कालावधीत ते शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे जिवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, गावातील पीक पद्धती अशा विविध बाबींचाचा अभ्यास करणार आहेत. त्याच बरोबर या कालावधीत कृषी महाविद्यालय, फलटण मधील खलील पटेल, अनिल भोंग, राहूल भोंग, अनिकेत कुंभार, विश्वजीत भोसले, तेजस गाढवे, अराज राठोड, सिद्धांत भोसले हे कृषिदूत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामाना विषयी जास्तीत जास्त माहिती विविध ॲपद्वारे कशी संपादित करता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषिदूत कृषि आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कृषिदूतांचे मुरूम ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.