फलटण : फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर पंधरा वर्षानंतर पुन्हा संधी नाही हा इतिहास अबाधित ठेवत व चौथ्यांदा निवडून येऊन नवीन इतिहास रचण्याच्या आमदार दीपक चव्हाण यांच्या स्वप्नाला जनतेने छेद दिला आहे. फलटण विधानसभा सभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवखे उमेदवार सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचा तब्बल १७ हजार ४६ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिकार गृहा समोरील नवीन धान्य गोदामात आज सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला. एकूण सव्हिस फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या निकालात टपाली मतदान व सातव्या फेरीचा अपवाद वगळता पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांच्यावर आघाडी घेतली व शेवटच्या फेरीपर्यंत ती कायम ठेवली. साधारपणे पाचव्या फेरी नंतर सचिन पाटील यांनी घेतलेली आघाडी व त्यांचे मताधिक्य वाढतच चालल्याने निवडणूक निकालचे चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागले व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. साधारणपणे पंधराव्या फेरीनंतर सचिन पाटील यांचे मताधिक्य दहा हजाराच्या पुढे गेल्यानंतर व फेरीनिहाय त्यात वाढ होत असल्याने सचिन पाटील हे विजयाकडे कुच करत असल्याचे दिसून आले, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषाला सुरुवात केली, जसजसे प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होत होता, तसतसा कार्यकर्त्यांच्या जल्लोषात वाढ झाली. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतिषबाजीला सुरुवात झाली व सचिन पाटील यांचा विजय निश्चित होताच त्यामध्ये वाढ झाली.
या निवडणुकीत एकूण तीन लाख ३९ हजार ६६२ मतदारांपैकी दोन लाख ४१ हजार ३७६ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारमध्ये एक लाख १५ हजार ४ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत महिलांच्या वाढलेल्या मतांचा टक्का नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याची अनेकांना उत्सुकता होती, परंतु बहुसंख्य महिला मतदारावर महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पडल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. या निवडणुकीत अंतिम फेरीच्या निकालाअंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना एकूण एक लाख दोन हजार २४१ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सचिन पाटील यांना एक लाख १९ हजार २८७ एवढी मते मिळाल्याने ते सतरा हजार सेहेचाळीस एवढ्या मताधिक्याने विजयी झाले.
निकाल जाहीर होताच दीपक चव्हाण यांनी नूतन आमदार सचिन पाटील यांचे मतमोजणी केंद्रावर अभिनंदन केले. यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची फलटण शहारातून गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करत रॅली काढण्यात आली.
या निवडणुकीत गेल्या दोन्ही वेळेला दीपक चव्हाण यांना निकाराची झुंज देणारे दिगंबर आगवणे हेही रासपकडून निवडणूक रिंगणात होते. परंतु ते सध्या कारागृहात असल्याने त्यांची उमेदवारी मोठी चर्चेची ठरली होती. त्यांची उमेदवारी महायुतीच्या विजयात अडथळा ठरणार का याबाबत उलटसुलट चर्चा होत होती. आगवणे यांना एकूण तेरा हजार ८२८ मते मिळाली असली तरी त्याचा परिणाम महायुतीवर झाला नसल्याचे दिसून आले. त्याच बरोबर जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव हेही निवडणूक रिंगणात होते त्यांना संविधान समर्थन समिती व स्वाभिमानी पक्षाचे समर्थन होते, त्यामुळे त्यांची उमेदवारी कोणाला भोवणार याकडेही अनेकांच्या नजरा होत्या, परंतु त्यांना केवळ एक हजार ९३३ एवढीच मते मिळाल्याने सदर चर्चा निरर्थक ठरली.