फलटण तालुक्यात सायंकाळी पाच पर्यंत ६३ टक्के मतदान ; महिलांनी रांगा लावून केले मतदान

फलटण : फलटण विधानसभा मतदार संघात आज सायंकाळी पाच वाजे पर्यंत त्रेसष्ट टक्के मतदान पार पाडले. यामध्ये एकूण पर्यंत एकूण दोन लाख १४ हजार १२ एवढे मतदान झाले असून त्यामध्ये एक लाख ९ हजार ६९१ पुरुष व एक लाख ४ हजार ३१३ महिला मतदारांचा समावेश आहे. ग्रामीण भागात महिलांनी रांगा लावून मतदान केल्याचे चित्र ठिकठिकाणी आज दिवसभरात दिसून आले.
विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदार संघातून एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात एकूण तीन लाख ३९ हजार ६६२ एवढे मतदान असून त्यामध्ये एक लाख ७२ हजार ९४० पुरुष, एक लाख ६६ हजार ७०८ महिला व १४ तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर ग्रामीण भागात विडणी येथे जिल्हा परिषद शाळा व उत्तरेश्वर हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या, त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. त्याचबरोबर निंबळक, पिंप्रद, कुरवली, आंदरुड, दुधेबावी, कोळकी येथेही मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. सस्तेवाडी येथील मतदान केंद्रावर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात आली होती.

राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले धुमाळवाडी येथे ‘जय किसान’ या मतदान केंद्रामध्ये जांभूळ, अंजीर, सीताफळ, आवळा, आंबा, पपई, खरबूज, फणस, चिक्कू, डाळिंब, संत्री, ड्रॅॅगन फ्रूट, द्राक्षे, आदी फळाची माहिती व त्यापासून होणारा लाभ याविषयी माहिती देणारे माहिती फलक लावण्यात आले होते.
फलटण येथे सुमन वसंतराव इंगळे वय ८७, आंदरुड येथे इंदुबाई केदारी राऊत वय ९३, सासकल येथील रामचंद्र गार्डे वय ९५, धुमाळवाडी येथे १०५ लक्ष्मीबाई शिरतोडे यांच्यासह साखरवाडी येथे १०४ वर्षीय वयोवृद्ध महिलेने आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये आकर्षण निर्माण होऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी

फलटण तालुक्यामध्ये एकूण सात आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये मुधोजी हायस्कूल फलटण, सखी मतदान केंद्र कोळकी, युवा मतदान केंद्र गोखळी व विडणी, सक्षम मतदान केंद्र वाठार निंबाळकर, जय किसान मतदान केंद्र धुमाळवाडी, ऐतिहासिक वारसा मतदान केंद्र, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण यांचा समावेश आहे. मतदान केंद्रामध्ये स्वीप कक्षा मार्फत अपंग व वयोवृद्ध मतदारांना व्हीलचेअर, मुलांसाठी खेळणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाने पुरविलेल्या सुविधांचा अवलंब करून मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!