दिगंबर आगवणे कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात – जयश्री आगवणे

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षातून दिगंबर आगवणे हे शिट्टी या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या उमेदवारी विषयी जाणिवपूर्वक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु जनता त्याला भुलणार नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज हा जनतेचा आशिर्वाद म्हणून भरलेला असून दिगंबर आगवणे हे कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून ही निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात आहेत, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री आगवणे यांनी केले.
फलटण शहरातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या, यावेळी त्यांच्या समवेत रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जयश्री आगवणे म्हणाल्या,
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या एक महिन्यापासून मी प्रचार दौरा करीत आहे. दिगंबर आगवणे यांनी आजवर जी जी कामे केली आहेत, त्या कामांच्या अनुषंगाने या मतदारसंघातील जनतेचा त्यांच्यावर असणारा विश्वास व प्रेम आजही अबाधित असल्याचे आपणास स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे ते जनतेचे उमेदवार आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शिट्टी हे निवडणूक चिन्ह घेऊन दिगंबर आगवणे हे कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून ही निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात आहेत. दिगंबर आगवणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आपण ज्या ज्या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील गावागावातील घराघरांमध्ये गेलो, त्या त्या वेळी प्रचार साहित्या वरील त्यांचा फोटो पाहून लोक भावुक होतात, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी असून त्यांनाच मतदान करणार असल्याचे ठामपणे सांगतात.
दिगंबर आगवणे यांचा उमेदवारी अर्ज कोणाच्या तरी सांगण्यावरून भरण्यात आलेला आहे, मतांची विभागणी होण्यासाठी भरण्यात आलेला आहे अशा विविध प्रकारच्या चर्चा जाणिवपूर्वक मतदार संघामध्ये पसरवल्या जात आहेत. आजवर आगवणे यांनी जी काही कामे या मतदारसंघांमध्ये केली आहेत, अथवा निर्णय घेतले आहेत, ते त्यांनी पूर्णतः स्वबळावर घेतले आहेत, अन्य कुणाच्याही सांगण्यावरून नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज हा जनतेचा आशीर्वाद म्हणून भरलेला आहे, तो कुणाच्या सांगण्यावरून अथवा कोणाची मते खाण्यासाठी मुळीच भरलेला नाही. आमच्या विरोधात जाणीवपूर्वक जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जनता त्याला अजिबात भुलणार नाही व वीस तारखेला ती मतदानाच्या रूपाने दिगंबर आगवणे यांच्याच पाठीशी राहील व त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वासही जयश्री आगवणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!