फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड, फलटण येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी पंधरा नोव्हेंबर पर्यंत मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.
बाजारामध्ये सोयाबीन शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यासाठी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाअंतर्गत नाफेडमार्फत हंगाम २०२४-२५ मध्ये सोयाबीन खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी. सोयाबीन या शेतमालाचा हमीभाव चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल असून, कमाल आर्द्रता बारा टक्के आवश्यक आहे. सन २०२४-२५ च्या सातबारावर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरासरी उत्पादकता विचारात घेता प्रति हेक्टरी २६ क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे. त्याच दिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे सांगून हमीभाव खरेदी बाबत अधिक माहिती साठी फलटण तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठल जाधव व बाजार समितीचे स्वप्नील देशमुख यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.