फलटण : भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व समस्थ नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रा मंगळवार दि . १२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता साधुबुवाचा ओढा, राजुरी येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. ही यात्रा सायंकाळी फलटण मुक्कामी विसावणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे.
संत ज्ञानदेव व संत नामदेव महाराज यांनी १२ व्या शतकात उत्तर भारतात जावुन श्री विठ्ठल भक्तीचा व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला होता. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची घुमाण येथे वस्त्र समाधी आहे. मुगल सम्राट मोहंमद तुघलक यांचे नातु फिरोजशा तुघलक यांनी घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर उभारले आहे. विठ्ठल भक्ती, शांती, समता व बंधूता यांचा संदेश देणाऱ्या भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही यात्रा काढली जाते. यात्रेचे हे तिसरे वर्ष असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातुन प्रवास करीत ही यात्रा सोमवार दि. २ डिसेंबर रोजी चंदिगड पंजाब येथे पोहोचणार आहे. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाब राज्यात राजभवन येथे या यात्रेचे स्वागत करणार आहेत. बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी ही यात्रा श्री क्षेत्र घुमाण येथे पोहचणार आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर राजुरी ता. फलटण येथे यां यात्रेचे स्वागत जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ही यात्रा फलटण शहरातील श्री विठ्ठल मंदिर येथे विसावणार आहे. तरी संत नामदेव पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, शिंपी समाज महिला मंडळ व फलटण नामदेव समाजोन्नती परिषदेच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे.