फलटण : संपूर्ण महाराष्ट्रात शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांची लाट नव्हे तर सुनामी आली आहे. भारतीय जनता पक्ष, अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष व शिंदे शिवसेनेला महाराष्ट्राने हद्दपार करण्याचं ठरवलेलं आहे. फलटणमध्ये समोर असलेल्या पक्षाचे चिन्ह हे शरदचंद्रजी पवार साहेबांकडून चोरलेल चिन्ह आहे, आणि चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत नाही असा टोला लगावत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आमदार दीपक चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
विडणी ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ विडणी ता. फलटण येथे आयोजित केलेल्या सभेत मोबाइलद्वारे संवाद साधताना खा. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते महादेवराव पवार, श्रीराम जवाहरचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, महेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रकृती अचानक बिघडल्याने व डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने इच्छा असतानाही विडणीकरांच्या दर्शनाला येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मोबाईलद्वारे संवाद साधताना खा. कोल्हे म्हणाले, फलटणची भूमी ही ऐतिहासिक आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारखे स्वाभिमानाचे प्रतीक ज्यांच्या उदरातून जन्माला आले, त्या सईबाई साहेबांच्या या भूमीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्र धर्म निश्चितपणे जपला जाईल. आपल्या वाडवडीलांनी आपल्याला सांगितलेल आहे की, चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत नाही. आणि त्या पद्धतीने समोर असलेल्या पक्षाचे चिन्ह हे शरदचंद्रजी पवार साहेबांकडून चोरलेले चिन्ह आहे. आणि चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवायची नाही हे आपल्याला माहिती आहे अशी टीका त्यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर नाव न घेता केली. फलटण विधानसभा मतदार संघाला आमदार म्हणून लाभलेले दीपकराव चव्हाण हे एक सुसंस्कृत, निष्कलंक व्यक्तिमत्व आहे. आपणास आमदार म्हणून ते लाभणं हे निश्चितपणे भूषणावह आहे. ते या निवडणुकीत नक्की विजयाचा चौकर मारतील असा विश्वासही व्यक्त केला. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल, त्याच पद्धतीने या विधानसभा निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळणार आहे असे सांगून ते म्हणाले, शरद पवार यांचे हात बळकट करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे पार पाडाला अशी अपेक्षा व्यक्त करतो व तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह घरोघरी पोहोचवून आमदार दीपकराव चव्हाण यांना विजयाचा चौकार मारण्याची संधी द्या अशी कळकळीची विनंती देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी मतदारांना केली.