फलटण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याच नेतृत्व आहे त्यांचा विकास कामांंबाबतचा दृष्टिकोन व विकास कामे करण्याचा धडाका संपूर्ण राज्याला परिचित आहे. राज्यासाठी त्यांनी नेहमीच मोठ मोठे प्रकल्प, योजना राबविल्या आहेत. दर्जात्मक विकासासाठी ते नेहमी आग्रही व ठाम असतात. परंतु असे असतानाही फलटण तालुका मात्र विकासाच्या बाबत मागेच राहिला, कारण या तालुक्यातील नेतृत्व त्या ताकतीचं नसावं म्हणूनच या तालुक्यामध्ये प्रगती झाली नसावी असा खोचक टोला महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांना नाव न घेता लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्यावतीने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांची उपस्थिती होती.
फलटणच्या विकासाबाबत माझ दादांबरोबर बोलण झाल आहे. त्यामध्ये दादांनी माझ्याबरोबर एक वादा केला आहे. काहीही झाल तरी बारामतीप्रमाणे फलटण तालुक्याचा निश्चितपणे विकास करेल, आणि हा वादा मी नक्की पूर्ण करेन असे सांगून पाटील म्हणाले, फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केल आहे. अगामी काळात निश्चितपणे फलटण शहरातील रस्ते दर्जात्मक व खड्डेमुक्त झालेले दिसून येतील. शहरात ज्या योजना अर्धवट राहिल्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याचं काम मी करणार आहे. स्वच्छ व सुंदर फलटण शहराची ओळख ग्रीन सिटी म्हणून आम्ही निर्माण करणार आहोत. कमिन्स कंपनीवर आम्ही जो मोर्चा नेला होता तो राजकीय स्टंट आहे असा आरोप आमदार दीपक चव्हाण यांनी केला आहे, त्यांचा आरोप अतिशय बेजबाबदारपणाचा आहे. कारण ज्यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे हे फलटण येथे आले होते व त्यांनी फलटणमधील सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्याने मुलांना आम्ही चोवीस हजार रुपये पगार देत असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच होती, त्यांच्या हातात नाम मात्र दहा ते बारा हजार रुपये पडत होते. त्यामुळे तालुक्यातील या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतली आहे. कमिन्स कंपनी देत असलेला पगार व कामगारांच्या हातात पडत असलेली प्रत्यक्षातील रक्कम यामध्ये मोठी तफावत आहे आणि ही तफावत दूर करण्यासाठी आणि येथे सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार कोण करतय याबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत व तो पूर्णत्वासही नेणार आहोत असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. स्व. आमदार चिमणराव कदम यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनामधून झिरपवाडी ता. फलटण येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले होते. परंतु राजकीय अनास्थेमुळे त्याची सध्या काय दुरवस्था आहे हे तालुका पाहत आहे. परंतु आगामी काळात हे रुग्णालय सुरू करून तेथे आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी पुरेपूर योगदान देणार आहे.
उत्तर कोरेगाव मधील २६ गावांच्या पाण्याचा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, आहे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या भागासाठी ०. ५२ टीएमसी पाणी मंजूर करून आणले आहे. ते पाणी पाईपलाईनद्वारे, ओढ्या, नाल्यांमार्फत या गावांमधील पाझर तलाव भरण्याच काम करून त्यांना पाणी मिळवून देण्याचं काम आपण ताकदीने करणार आहोत. अनुसूचित जातीमध्ये जे जे समाज समाविष्ट आहेत त्या प्रत्येक समाज बांधवांच्या सर्वांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगत अलीकडच्या काळात एमपीएससी, यूपीएससी परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रमाणात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्या प्रमाणात त्यांना अभ्यासाच्या सुविधा मिळत नाहीत, त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जे युवक व युवती एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक सुसज्ज अशी लायब्ररी सुरू करणार साल्याचे सांगितले. याशिवाय नाईकबोम वाडी येथील नवीन औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, सर्व सुविधायुक्त बस स्थानक, सिंचनाची राहिलेली कामे, ग्रामीण भगिती शिक्षणाचा दर्जा उंचावणे, फळ बागा, शेतीमाल खरेदी केंद्र, क्रीडा संकुल, नाट्य संकुल आदी विविध मुद्द्यानावरही त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली.
म्हणून मी सचिन पाटील…
स्व. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा मी कार्यकर्ता आहे. मी जसं मत देतोय तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पाटील ही ओळख मला नेत्यांनी दिली आहे व गेल्या तीस ते पस्तीस वर्षात हीच ओळख माझी सर्वत्र रूढ झालेली आहे. म्हणून मला ज्या नावाने ओळखले जाते, तेच नाव पुढे यावं लोकांच्या तोंडात व लक्षात राहावे म्हणून मी माझं नाव सचिन पाटील केले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.