फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या फलटण शहरातील प्रचार दौऱ्याचा व कार्यालयाचा शुभारंभ उद्या गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी होणार आहे.
फलटण शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर येथे दुपारी दोन वाजता माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होणार आहे. २००९, २०१४, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला आहे. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही ते चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेससह अन्य घटक पक्षांच्या महाविकास आघाडी मधून विजयाच्या निर्धाराने उतरले आहेत. त्यामुळे सलग चौथ्यांदा निवडून येऊन ते विक्रमी कामगिरी करणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.