फलटण : कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या वतीने जी अश्वासने दिली आहेत, त्यामधील बहुतांशी आश्वासने सांभाळता येण्यासारखी आहेत. परंतु विरोधकांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यामधील बऱ्याशा योजना त्याना करताच येणार नाहीत अशी टीका करून महायुतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा प्रचार चालू आहे मी व देवेंद्र फडणवीस यांनीही त्यामध्ये पूर्णतः झोकून देत निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्धी केल्यानंतर पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते.
कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांनी बरीच आश्वासने दिली तुम्ही अर्थमंत्री आहात हा डोलारा त्यांना सांभाळता येइल का यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासने दिली आहेत, त्यामधील बहुतांशी आश्वासने ही सांभाळता येण्यासारखी आहेत. आपण आपल्या राज्याचे उत्पन्नाचे मार्गही वाढवायचे असतात. ज्यावेळेस आम्ही अर्थसंकल्प सादर करतो, त्यावेळी हा विचार नेहमी करत असतो की बचत करताना त्याचा परिणाम सर्वसामान्य घटकावर होणार नाही व बचतीनंतर त्या योजनांना निधी मिळेल. काल परवा आपण विरोधी पक्षांची भाषणे ऐकली. ते आमच्यावर आरोप करतात की एवढ्या घोषणा प्रत्यक्षात कशा येणार, या घोषणा प्रत्यक्षात यायला राज्य कर्जबाजारी होईल किंवा राज्य कंगाल होईल व आम्ही दिलेली जी आकडेवारी त्यांनी ती आणखीन वाढवली आहे. राज्यातील सर्व प्रकल्प गुजरात मध्ये गेले अशा टीका आमच्यावर विरोधक करतात त्या चुकीच्या आहेत. विरोधकांच्या वेगवेगळ्या योजना ज्या आर्थिक भार देणाऱ्या आहेत, अशा प्रकारच्या योजना त्यांनी सादर केल्या आहेत. परंतु अर्थ मंत्रालयातला माझा दहा वर्षाचा अनुभव पाहता त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना त्यांना करताच येऊ शकणार नाहीत. केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नसल्यामुळे केंद्राकडून भरीव अशा प्रकारची मदत ही राज्याला मिळायला हवी ती त्या बाबतीत त्यांना मिळू शकत नाही. आमचं मात्र उलट आहे आम्हाला मदत मिळू शकते, हे आंध्र व बिहारच्या उदाहरणावरून आपण सगळे पाहता. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या योजना आम्ही निश्चितपणे चालवू असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रामध्ये एनडीए च सरकार सलग तीन वेळा आल्याने महाराष्ट्रातील वातावरणात बदल आहे. यावेळी लोकसभा निवडणुकी सारखे ते नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, लोकसभा निवडणूकावेळी वेगवेगळे आरोप करून आमच्या विरोधात संविधान बदलणार आहोत असा चुकीचा मतप्रवाह लोकांमध्ये तयार करण्यात विरोधकांना यश मिळाले होते, त्याची मोठी किंमत आम्हाला चुकवावी लागली. परंतु संविधान बदलने ही अशक्यप्राय गोष्ट आहे आम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून तिच्या हातात संविधानाची प्रत दिली आहे. पंतप्रधानांपासून ते अगदी सर्वसामान्य घटकापर्यंत आमच्या सर्वांच्या मनामध्ये संविधानाप्रती आदरच आहे हे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, मनोज जरांगे हे निवडणुकीपूर्वी सांगत होते की, आम्ही विधानसभा निवडणुका लढविणार आहोत व उमेदवार उभे करणार आहोत. परंतु नंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला लढायचं नाही. जो उमेदवार चांगला वाटेल त्याला मतदान करा असं त्यांनी आवाहन केले आहे. त्यांनी चांगल्या उमेदवाराला मतदान करायला सांगितले आहे. आम्ही आम्हाला चांगले समजतो त्यामुळे आमच्या उमेदवारांना निश्चितपणे फायदा होईल. बारामतीमधून पुतणे युगेंद्र पवार त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत त्यावर बोलताना ते म्हणाले, बारामती येथून अजित पवार यांनी लढायचं हे माझ्या पक्षाने ठरवल आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की, दादा तुम्ही अन्यत्र कुठूनही न लढता बारामती इथूनच लढायच आहे. तुम्हाला बारामती मधूनच उभं राहावं लागेल आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही. लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांच ऐकावं लागतं आणि त्याच हिशोबाने मी उभा आहे. आता माझ्या विरोधात कोणाला उभे करायचं हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे आणि त्यांनी त्यांचा उमेदवार माझ्या विरोधात दिलेला आहे. बारामतीचे प्रतिनिधित्व कोण चांगल्या प्रकारे करेल हे मतदारच ठरवतील व त्यांनाच ते मतदान करतील असे सांगून मी सात वेळा विधानसभा व एक वेळा लोकसभा लढलो आहे व प्रत्येक वेळेला बारामतीकरांनी मला चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं आहे असे ही पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
“रामराजे यांना नोटीस पाठवतो..!”
एरव्ही राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे विधान परिषदेचे माजी सभापती व फलटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या जिल्ह्यात, तालुक्यात कुठल्याही प्रचारात दिसत नाहीत याबाबत पवार यांना छेडले असता त्यावर त्यांनी त्यांना नोटीस पाठवतो का दिसत नाही म्हणून असे उपरोधात्मक उत्तर दिले.