प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप किंवा घड्याळ कोणत्याही चिन्हावर असुद्या आम्हाला फरक पडणार नाही – आ. दीपक चव्हाण

फलटण : गेल्या पंधरा वर्षात आमदार म्हणून मी माझे कर्तव्य निश्चितपणे पार पाडले आहे. सर्वसामान्य घटकाच्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आपला प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अथवा घड्याळ कुणाच्याही चिन्हावर असला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
२५५ फलटण-कोरेगाव मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आपण आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रोजगार निर्मिती, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, कालव्यांची कामे या सारख्या विविध महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक चांगल्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात ज्या भागात पाणी नव्हते, तो भाग सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. तीनही वेळेला मला जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप अथवा घड्याळ कुणाच्याही चिन्हावर असला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमचा जो मतदार आहे तो ठरलेला मतदार आहे. आजवर तीन वेळा विजय मिळाला असून या तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या जनतेने आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे समोर कुठलाही उमेदवार असला तरी आम्ही आमच्या कामामुळे तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणून या निवडणुकीमध्ये विजय होईल की नाही हे भाकीत करण्याची आवश्यकता नाही, माझा विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचेकडे सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे, नागराज जाधव यांची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!