फलटण : जिल्हा परिषद प्रा. शाळांमधील डिजिटल क्लास रुम, उत्तम वाचनालय, पुरेशा शैक्षणिक सुविधा, खेळाची साधने, सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न, वाढती गुणवत्ता याबाबी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून देवून शाळांमधील घटणारी पटसंख्या रोखण्याची गरज गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे.
जिल्हा परिषद प्रा. शाळा तरटेवस्ती, वाठार निंबाळकर, ता. फलटण येथे लोकसहभागातून डिजिटल क्लास रुम, स्टडी रुम, ज्ञानरचनावाद निर्मिती करण्यात आली असून त्याचे उद्धघाटन आणि फरांदवाडी केंद्र शिक्षण परिषद अशा संयुक्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ बोलत होते. यावेळी शिक्षण शास्त्र महाविद्यालय फलटण मधील अधिव्याख्याता फरांदे सर, केंद्र प्रमुख राजेंद्र पवार, सरपंच सौ. सुवर्णाताई नंदकुमार नाळे, उपसरपंच अमृत नाईक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य नेताजी निंबाळकर, सौ. सिमा निंबाळकर, बबन तरटे, फरांदवाडी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, तरटे वस्ती शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी संकपाळ म्हणाले, तरटे वस्ती, प्रा. शाळेचा आदर्श घेऊन इतर शिक्षकांनी आपल्या शाळेसाठी डिजिटल क्लास रुम व अन्य शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. भारती धुमाळ यांचेही त्यांनी कौतुक केले. एक शिक्षकी शाळा असूनही त्यांनी विविध उपक्रम राबविले आणि उत्कृष्ट काम स्वतः कष्ट घेऊन आणि लोकसहभागातून उभे करुन शाळेचा कायापालट केला आहे.
नागरिकांचा शैक्षणिक कार्यात असलेला सहभाग याबद्दल समाधान व्यक्त करीत तरटेवस्ती ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती, विशेषतः महिलांच्या सक्रिय सहभागाचा आवर्जून उल्लेख करीत गटशिक्षक्षणाधिकारी संकपाळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
शिक्षण शास्त्र महाविद्यालय, फलटण मधील अधिव्याख्याता फरांदे सर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदल, PAT परीक्षा, विद्यार्थी गुणवत्ता, पालकांच्या अपेक्षा इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. वस्तीवर शाळा असून ही विद्यार्थ्यांसाठी एवढे उपक्रम राबविले याचे त्यांनी कौतुक केले. विशेषत: दगडावर केलेल्या पेंटिंग्जचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रा. शाळेतील सुधारणा, त्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग याबद्दल समाधान व्यक्त करताना, ज्याप्रमाणे घराची कळा अंगण सांगते त्याचप्रमाणे गावाची कळा शाळा सांगते, आमची शाळा आमच्या गावाची ओळख बनली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अश्विनी तरटे यांनी केले.
केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेमध्ये शालेय कामकाज व शासकिय माहिती याविषयी चर्चा झाली.
प्रारंभी तरटे वस्ती प्रा. शाळेच्या शिक्षिका सौ. भारती धुमाळ यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात लोकसहभागातून तयार केलेल्या डिजीटल वर्गामध्ये बोलक्या रंगचित्रासह भिंती साकारल्या आहेत, त्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी या विषयाची स्वतंत्र स्टडीरुम केली आहे. प्रत्येक विद्याथ्यार्थ्यास स्वतंत्र स्टडी टेबल उपलब्ध असून फिरते वाचनालय आहे, भिंतीवरील चित्रासह वर्गात ज्ञानरचनावाद तयार केला असून इयत्ता २ री ते ४ थी चे विद्यार्थी/विद्यार्थीनी त्यावरुन ५/६/७ अंकी संख्यांचे लेखन वाचन करतात. सचिन तरटे ग्रामस्थ तरटेवस्ती यांनी या ज्ञानरचना वादासाठी अतिशय सुंदर इपाॅक्सी फ्लोअर कोटिंग केले असल्याचे सौ. धुमाळ यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ. फरांदे यांच्या हस्ते झाले. यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अतिशय सुंदर वस्तू मांडल्या होत्या, पिस्ताच्या टरफलापासून व शिसपेन्सिल पासून तयार केलेली अतिशय सुंदर दिवाळी ग्रिटिंग कार्ड सर्वांना आवडली, तसेच मातकामात पणती, भांडी, फळे, गणपती तयार केले होते, तर विद्यार्थी संचयिका व प्रोजेक्ट यांचेही संकलन होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मुलांनी तयार केलेली ग्रिटिंग कार्ड देऊन केले.
डिजीटल वर्गासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद तरटे वस्ती ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून करण्यात आली. डिजीटल वर्ग करण्यासाठी वस्तीवरील नागरिकांनी खारीचा वाटा उचलला आहे. तरटे वस्तीवर शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्रा. विकास तरटे, प्रकाश तरटे, प्रविण तरटे, प्रदिप तरटे, अनिल तरटे, नाना कुंभार, अमोल जाधव, मारुती चव्हाण, प्रकाश जाधव तुषार तरटे, अमृतसिंह नाईक निंबाळकर, विठ्ठल तरटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य बबन तरटे, पांडुरंग तरटे व नागरिकांचे नेहमीच आर्थिक बाबतीत सहकार्य असते. सर्व साधारण पणे ५ लाख रुपये खर्च करुन लोकसहभागातून प्रा. शाळा विकास झाला असल्याचे प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धुमाळ यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
केंद्रातील शिक्षिका अनुराधा पाटील यांनी
सुत्रसंचालन केले. समारोप आभार CT प्रदर्शनाने झाला.