आ. दीपक चव्हाण चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात ‘चला उमेदवारी अर्ज भरायला’ राष्ट्रवादीचे आवाहन


फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा सभा मतदार संघातून विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे आज (दि. २५) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातून तुतारीच्या चिन्हावर ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार दीपक चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता श्रीराम मंदिर येथून शक्ती प्रदर्शन करीत ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने ‘चला उमेदवारी अर्ज भरायला’ असे आवाहन समर्थकांना केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले होते. परंतु महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपातील नेत्यांशी असणारा संघर्ष व कार्यकर्त्यांचा रेटा यामुळे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर व राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत फलटण येथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. आमदार रामराजे यांनी मात्र अजित पवार यांची साथ न सोडता तटस्थ राहणार असल्याचे सांगितले असले तरी आपण महायुतीचा प्रचार करणार नसल्याचेही खडसावून सांगितले आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर कोणते डावपेच लढविणार याबाबत उत्सुकता आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!