फलटण : फलटण सह लोणंद व खंडाळा पोलीस ठाण्यात घरपोडी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
रोहित उर्फ टक्या चिवळ्या पवार रा. सुरवडी ता. फलटण, आकाश तथा गमजा तथा पप्या टेलरिंग भोसले रा. बोरी ता. खंडाळा, पायगुण खमखम भोसले रा. हळगाव ता. जामखेड अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर सुनील शिवा काळे रा. वडगाव ता. फलटण हा फरारी आहे.
फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील बीबी ता. फलटण येथे बीबी ते आळजापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला अडवून तीन जणांनीतिच्या गळ्यातील, कानातील व दोन लेडीज अंगठ्या असे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना समजली. त्यानुसार त्यांनी बीबी येथे जाऊन गावातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश व आरोपींचे वर्णन नमूद करून परिसरातील रस्त्यांची नाकेबंदी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ तासातच या गुन्ह्यात सहभाग असलेल्या संशयावरून संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी ते गेले असता त्यांच्यावर संशयीतांसह त्यांच्या नातेवाईकांनी दगडफेक केली. यावेळी सदर आरोपी उसाच्या शेतात पळून जाऊन लपून बसले. परंतु पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता फलटण शहर पोलीस ठाण्यासह खंडाळा व लोणंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांनी त्याची कबुली ही दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण दोन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.