फलटण : भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी आई-बाबांना प्लीज तुम्ही मतदान करा, असे आवाहन चिमुकल्यांनी स्वतः पत्र लिहून केले आहे.
प्राथमिक शाळा जिल्हा परिषद गिरवी, तालुका फलटण येथे मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सदर आवाहन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदाने व अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले. भारताची लोकशाही अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे अशी नम्र विनंती पत्राद्वारे करत आहे अशी भावनिक साद चिमुकल्यांनी घातली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मतदान, लोकशाहीचा अर्थ याबाबत जागृती करण्यात आली. पत्र लेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला. प्रत्यक्ष पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे हे त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण होते.