
फलटण : आदिवासी कोळी महादेव समाज व ऑफ्रोह संघटनेच्या वतीने कोळकी ता. फलटण येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आद्य क्रांतिवीर जननायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे, शिका संघटित व्हा, असा मूलमंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे व फलटण तालुका पंचायत समिती चे माजी सदस्य सचिन रणवरे, कोळकीच्या ग्रामपंचायत सदस्या रेश्मा देशमुख यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आदिवासी संस्कृती, परंपरा व चालीरिती यांचे संवर्धन करणेसाठी तसेच आदिवासी जमातीचे शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी हा आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. नद्या डोंगर, पर्वत, निसर्ग यांच्या सान्निध्यात असणारा हा समाज नेहमीच उपेक्षित राहिला आहे. आदिवासी जमातीत कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, हलबा, ठाकर, छत्री आदी ३३ जमातींचा समावेश होतो. आजही त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. आदिवासी कोळी महादेव समाजास आमच्या परीने होईल ती मदत आम्ही निश्चिंत करू येणाऱ्या पुढील काळात समाजाच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी यावेळी दिले.
पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात तालुका स्तरावर आदिवासी दिन साजरा करून सामाजिक प्रश्नाची उकल करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी यावेळी दिली.
आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणे तसेच सामाजिक उन्नतीसाठी संघटित राहण्याचे आवाहन ऑफ्रोहचे सातारा जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ यांनी यावेळी केले.
या प्रसंगी केले.सचिव थिगळे, मोहन कोंडके, महेश बेसके, अनिल बेसके, सौ. दिपा धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सातारा जिल्हा अध्यक्षा व ऑफ्रोहच्या राज्य उपाध्यक्षा भारती धुमाळ यांनी केले. आभार मच्छिंद्रनाथ माने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रवीण धुमाळ व अन्य समाजबांधवांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास कोळकी व परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
